किशोर बेलसारे, नाशिक: आक्षेपार्ह इन्स्टाग्राम स्टोरी दुसऱ्याला शेअर केल्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या पिंपळगावमध्ये घडली आहे. आर्यन बेगानीया असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी आंदोलन केले तसेच शहरात कडकडीत बंदही पाळण्यात आला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शौर्य दिनानिमित्त इन्स्टाग्रामवरील स्टोरी दुसऱ्याला शेअर केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला १० ते १५ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना पिंपळगाव शहरात घडली. आर्यन बेगानीया असे या तरुणाचे आहे. या तरुणाने इन्स्टाग्राम अकाउंटवर ठेवलेली स्टोरी त्याचा मित्र मिजान शेख याने दुसऱ्याला शेअर केली होती. त्यावरून वाद होऊन मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे.
नक्की वाचा: EVM विरोधी आंदोलन पेटणार? शरद पवारांपाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधीसुद्धा मारकडवाडीला जाणार
या मारहाणीत आर्यन प्रचंड गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर नागरिकांनी काही वेळ पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले होते. या घटनेवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, आज संपूर्ण शहरामध्ये बंद पाळण्यात आला आहे , स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढून घटनेचा निषेध केला यामध्ये मोर्चेकर्यांनी संशयित आरोपींना कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी ६ संशयिताना पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या शहरात शांतता आहे. पोलिसांनी नागरिकांना दुकाने सुरु करण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाची बातमी: मारकडवाडी आता भाजपही सभा घेणार, प्रकरण चिघळणार?