पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा 20 वा हफ्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांची लक्ष लागले होते. त्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा पुढील हप्ता जारी करणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी येथील कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना कसा मिळेल याचा ही यातून आढावा घेण्यात आला.
या बैठकीत देशातील 731 कृषी विज्ञान केंद्रे (KVKs), भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), आणि कृषी विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू आणि प्रमुख यांनी व्हर्च्युअली सहभाग घेतला. केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ग्राम पातळीवरील शेतकऱ्यांशी हा कार्यक्रम जोडण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमाचे देशव्यापी अभियानाप्रमाणे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. KVKs ना निर्देश देताना, चौहान यांनी यावर जोर दिला की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी एका हप्त्यासह, तीन हप्त्यांमध्ये ₹6,000 हस्तांतरित केले जात आहेत.
या प्रक्रियेत KVKs महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांनी लवकर तयारी करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय हा कार्यक्रम एक उत्सव आणि एक मिशन दोन्ही म्हणून साजरा केला पाहिजे असं ही त्यांनी सांगितलं. कारण यामुळे थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सुनिश्चित होते. एक सार्वजनिक जागरूकता मोहीम म्हणूनही तो कार्य करतो असं ही ते म्हणाले. केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांना 2 ऑगस्टच्या कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कारण या योजनेचा लाभ घेण्याची आणि कृषी विकास कार्यक्रमांबद्दल माहिती मिळवण्याची संधी यात असल्याचं ते म्हणाले.
नक्की वाचा - Al Qaeda: अल कायदाची ही आहे भारतातील मास्टरमाइंड, शमाचं काय आहे पाकिस्तान कनेक्शन
चौहान यांनी अधिकाऱ्यांना कृषी सखी, ड्रोन दीदी, बँक सखी, पशु सखी, विमा सखी आणि ग्रामपंचायत सरपंच यांसारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा उपयोग करून या कार्यक्रमाची माहिती व्यापकपणे पसरवण्याचे निर्देश दिले. या काळात शेतकऱ्यांशी खरीप पिकांबद्दल संवाद साधणे, सहभाग वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण सहभागासह आणि कटिबद्धतेने हा कार्यक्रम राबवला जाईल असं चौहान म्हणाले.
2019 मध्ये योजना सुरू झाल्यापासून, 19 हप्त्यांद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ₹3.69 लाख कोटी हस्तांतरित करण्यात आले आहेत. 20 व्या हप्त्यात 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ₹20,500 कोटी हस्तांतरित केले जातील. कृषी सचिव देवेश चतुर्वेदी, ICAR चे महासंचालक डॉ. एम.एल. जाट आणि कृषी मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.