
आकाश सावंत,
Beed Political News : बीड जिल्ह्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेले ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश निश्चित केला आहे.
आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत अजित पवार यांची भेट घेऊन हा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंडे कुटुंबाचे राजकीय वजन आणि पक्ष बदलाचे कारण
राजाभाऊ मुंडे आणि त्यांच्या कुटुंबाचे माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी या भागांमध्ये मोठे राजकीय वजन आहे. मात्र, त्यांना भाजपमधून डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली होती. त्यामुळेच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे.
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश होत असल्याने, पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपला बीड जिल्ह्यात, विशेषतः माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी या तालुक्यांमध्ये फटका बसू शकतो. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचे परिणाम दिसून येतील अशी शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world