भाजप आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर धस यांच्यावर टीकेची झोड उठली होती. ज्या धनंजय मुंडेंचे घोटाळे बाहेर काढण्याचा सपाटा धस यांनी लावला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातही धस यांनी मुंडे यांची कोंडी केली होती. त्यानंतर ते अचानक मुंडेंच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तूळात वेगळीच चर्चा रंगली. आता धस यांनी पुन्हा एकदा पुढे येत धनंजय मुंडे यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हे आरोप गंभीर असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कृषीमंत्री असताना धनंजय मुंडेंनी कसा घोटाळा केला हे धस यांनी सांगितले. मुंडे यांनी कृषी साहित्य खरेदी करताना मूळ बाबी बदलल्या असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा भ्रष्टाचार त्यातून झाला असल्याचे धस म्हणाले. त्याच बरोबर DAPमध्ये 56 कोटी 76 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचंही ते म्हणाले आहेत. तसा पुरावा ही त्यांनी सादर केला. त्याच बरोबर 577 रुपयांच्या कापूस साठवणूक बॅगेची 1,250 रुपयांना खरेदी केली असा आरोपही त्यांनी या निमित्ताने केला. या भ्रष्टाचाराची व्याप्ती फार मोठी असल्याचंही ते म्हणाले.
हा एकूण भ्रष्टाचार 300 कोटी रुपयांपर्यंत जातो असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची SIT कडून चौकशी करा अशी मागणी धस यांनी केली आहे. शिवाय धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचाराबाबत खुलासा करावा असंही ते म्हणाले. भ्रष्टाचाराबाबत भारतीय किसान संघाचं फडणवीसांना पत्र आहे. ते पत्र वाल्मिक कराडनं फाडून टाकलं होतं, असंही ते म्हणाले. कृषी विभागाकडे भारतीय किसान संघाच्या तक्रारीचं पत्र नाही, महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक या काळात केली गेली होती असंही ते म्हणाले.
विधीमंडळाचं अधिवेशन होवू घातलं आहे. त्या आधीच धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महायुतीमधल्या मित्र पक्षाकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याची विरोधक एकही संधी सोडणार नाहीत. विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. त्यामुळे विरोधकांची ही धार बोथट करण्यासाठी अधिवेशना आधीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या घोटाळ्याबाबत धनंजय मुंडे काय स्पष्टीकरण देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.