दिल्ली विधानसभा निवडणुका (Delhi Assembly Election) तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्षांनी तयार केलेल्या 'इंडी' आघाडीमध्ये प्रचंड मतभेद होण्यास सुरूवात झाली आहे. आम आमदी पार्टी (AAP) ने I.N.D.I.A आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढा अशी मागणी केली आहे. यासाठी इंडी आघाडीतील इतर पक्षांशी आपण बातचीत करणार असल्याचे आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी म्हटले आहे. याच संदर्भात केजरीवाल यांनी गुरुवारी दुपारी एक पत्रकार परिषद बोलावली असून यामध्ये मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'आप' काँग्रेसवर नाराज का आहे ?
आम आदमी पक्षातील नेते काँग्रेसवर प्रचंड नाराज असल्याचे कळते आहे. काँग्रेसचे नेते सातत्याने आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल विधान करत आहेत. यामुळे ही नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच विरोधकांची नवी मोट बांधली जावी आणि त्यात काँग्रेसला स्थान नसावे अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे.
केजरीवाल आणि आतिशींविरूद्ध काँग्रेसने दाखल केली पोलिसांत तक्रार
दिल्ली विधानसभा निवडणुकांपूर्वी मोफत योजनांवरून राजकारण तापायला लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली असून या गदारोळामध्ये आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संसद मार्ग पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
25 डिसेंबर रोजी युवक काँग्रेसने ही तक्रार दाखल केली होती आणि यासंदर्भात युवक काँग्रेसचे नेते अक्षय लाकरा यांनी म्हटले की आम्ही केदरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधा ही तक्रार दाखल केली आहे. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या योजना या लोकांची दिशाभूल करणाऱ्या आणि भ्रामक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याच प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी महिला सन्मान आणि संजीवनी योजना जाहीर केली होती. या योजनांवरून दिल्लीच्या आरोग्य विभागाने एक नोटीस जारी केली होती.