शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
Prithviraj Chavan on Sharad Pawar NCP : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही फुटीचे संकट ओढवणार का, अशी मोठी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक अत्यंत धक्कादायक दावा केला असून, शरद पवार गटाचे 5 ते 6 खासदार सध्या कमालीचे अस्वस्थ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, या खासदारांच्या मागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे दोघे हात धुवून लागले असल्याचा थेट आरोप चव्हाण यांनी केला असून, या राजकीय विधानामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले पवार?
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत अस्वस्थता असल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. चव्हाण यांनी दिल्लीतील सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधताना म्हटले आहे की, शरद पवार गटाच्या त्या 5 ते 6 खासदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी मोदी आणि शाह यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
केंद्र सरकारला देशात कोणताच विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही आणि याच रणनीतीचा भाग म्हणून शरद पवारांच्या खासदारांवर सध्या प्रचंड दबाव आणला जात आहे. या खासदारांच्या अस्वस्थतेमागे भाजपचे हेच मोठे दबावतंत्र कारणीभूत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.
( नक्की वाचा : राष्ट्रवादीत पुन्हा काहीतरी शिजतंय? खुद्द शरद पवार हजर असूनही रोहित पवार बैठकीला गैरहजर,आमदार संतापले )
'ऑपरेशन टायगर' नंतर आता पवारांच्या पक्षावर डोळा?
काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. या मोठ्या राजकीय भूकंपाला 'ऑपरेशन टायगर' असे नाव देण्यात आले होते. शिवसेनेतील या मोठ्या फुटीनंतर शरद पवारांचा पक्षही फुटणार किंवा हा संपूर्ण पक्षच एनडीएमध्ये दाखल होणार अशा जोरदार चर्चांना उधाण आले होते.
मात्र, त्यावेळी शरद पवारांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट खासदारांच्या आकड्यांसह हा नवीन दावा केल्यामुळे पवारांच्या पक्षात पडद्यामागे नक्कीच काहीतरी मोठे शिजत असल्याचे संकेत मिळत आहेत.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातून आता कोणताही नवीन पक्ष एनडीएमध्ये म्हणजेच सत्ताधारी आघाडीत सामील होणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे शरद पवारांच्या पक्षाबाबत सुरू असलेल्या चर्चा काहीशा शांत झाल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांचे ते विधान केवळ धूळफेक होते की काय, असा प्रश्न आता चव्हाण यांच्या दाव्यामुळे निर्माण झाला आहे. शांत झालेली राजकीय चर्चा पृथ्वीराज चव्हाण यांनी टाकलेल्या या नवीन राजकीय बॉम्बमुळे पुन्हा एकदा पेटली आहे.
( नक्की वाचा : Dombivli News: आधी डिस्चार्ज ठरला, मग अचानक निर्णय बदलला; अटकेत असलेल्या Ramesh Mhatre ला वाचवतोय तरी कोण? )
पवारांच्या पक्षातील अंतर्गत गणिते बिघडली?
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या टोकदार दाव्यानंतर आता शरद पवार यांच्या पक्षातून काय अधिकृत प्रतिक्रिया येते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एकीकडे पक्षात सर्व काही ठीक असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे स्वतः काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या नेत्याने खासदारांच्या अस्वस्थतेवर बोट ठेवल्यामुळे पवारांच्या पक्षात सर्व काही आलबेल नाही, हे आता उघड झाले आहे.
आगामी काळात हे 5 ते 6 खासदार काय भूमिका घेतात आणि शरद पवार पक्षाची ही संभाव्य फूट रोखण्यात यशस्वी होतात का, यावर आता राज्याचे पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.