Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीकडे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पाठ फिरवली असून, यामुळे पक्षातील इतर आमदारांमध्ये त्यांच्याविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे. विधिमंडळात आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला रोहित पवार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून रोहित पवार पक्षाच्या कोणत्याही प्रमुख कार्यक्रमात किंवा बैठकीत दिसत नसल्यामुळे, त्यांच्या मनात नेमके चालले तरी काय आहे, असा प्रश्न आता स्वतः पक्षातीलच आमदार आणि नेत्यांना पडला आहे.
आमदारांच्या नाराजीचे नेमके कारण काय?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीला खुद्द शरद पवार उपस्थित असतानाही रोहित पवार यांनी दांडी मारल्यामुळे पक्षातील इतर आमदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. रोहित पवार यांनी यापूर्वी केलेल्या काही वैयक्तिक आंदोलनांवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर आधीच पक्षातील काही आमदारांनी जाहीर आणि अंतर्गत नाराजी व्यक्त केली होती.
( नक्की वाचा : '1000 खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील'! Missing Link वरील प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर )
त्यातच आता विधिमंडळातील महत्त्वाच्या बैठकीलाही त्यांनी पाठ फिरवल्याने, इतर आमदारांचा संयम सुटला असून त्यांनी थेट बैठकीतच आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
उलटसुलट चर्चांना उधाण
रोहित पवार गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, राजकीय वर्तुळात त्यांना एनडीए (NDA) मध्ये सहभागी व्हायचे नसल्यामुळे किंवा महायुतीबाबतच्या काही राजकीय समीकरणांमुळे ते अशी भूमिका घेत आहेत का, अशीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : डोंबिवलीचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर अटक, आता शिंदे काय कारवाई करणार? )
एकीकडे शरद पवार पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे त्यांचेच नातू आणि पक्षाचे प्रमुख तरुण चेहरे असणारे रोहित पवार बैठकीला उपस्थित न राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे आता उघड झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world