विधानसभा निवडणुकीत राजापूर विधानसभा मतदार संघातून राजन साळवी यांचा पराभव झाला. त्यांचा शिवसेना शिंदे गटाच्या किरण सामंत यांनी पराभव केला. पराभव केल्यानंतर साळवी हे नाराज होते. आपला पराभव पक्षातील जेष्ठ नेत्यांनी केलायाचा त्यांनी आरोप केला. याबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडेही तक्रार केली होती. या सर्व घडामोडीमध्ये ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची बातमी बाहेर आली. त्यानंतर ते भाजपमध्ये जाण्याचे ही बोललं गेलं. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनीच मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे रत्नागिरीतलं राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साळवी यांनी भाजप प्रवेशाची चाचपणी सुरू केली होती. असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी केला आहे. पण पुढे ते असं ही सांगतात, जे गद्दार बोलले त्यांच्यासोबत साळवी जातील असं वाटत नाही. राजन साळवी हे निष्ठावान शिवसैनिक आहेत अशी सारवासारव ही त्यांनी केली आहे. राजन साळवी यांना पाच वेळा शिवसेनेनं उमेदवारी दिली.तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
राजन साळवी हे निष्ठावान शिवसैनिक असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. तसेच भाजप आणि त्यानंतर शिंदे शिवसेना यांच्यासोबत जाण्याची वेळ राजन साळवी यांच्यावर का आली. ते येवढे फरपट का चालले आहेत अशी विचारणा देखील त्यांनी केली. दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर केवळ दुसऱ्याच दिवशी राजन साळवी यांनी भाजपची चाचपणी सुरु केली होती. त्यावेळी आम्हाला मोठा धक्का बसला होता, असं देखील चाळके यांनी म्हटलं आहे. दरम्यान साळवी कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांच्यासोबत कुणीही जाणार नाही. शिवसैनिक हे उद्धव ठाकरें बरोबर राहातील असंही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसापासून राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार याची चर्चा सुरु होती. ते शिवसेना शिंदे गटात जाणार असंही बोललं जात होतं. पण उदय सामंत यांनी त्यांच्या प्रवेशाला लाल कंदील दाखवला होता. त्यानंतर साळवी हे भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं. पक्ष सोडण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. मात्र अजूनही त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित झालेला नाही. त्यात आता त्यांच्याच पक्षाकडून त्यांना निष्ठावान म्हणत घरचा आहेर देण्यात आला आहे.