Baramati News: अजित पवारांच्या बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? 'या' समाजातील नेते निवडणूक लढवण्यावर ठाम

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता बारामती विधानसभेच्या रिक्त जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Baramati Vidhansabha By Election 2026 Update

देवा राखुंडे, प्रतिनिधी 

Baramati Vidhansabha By Election 2026 : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता बारामती विधानसभेच्या रिक्त जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात राष्ट्रवादीला कितपत यश मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर बारामतीची पोटनिवडणूक  बिनविरोध झाली नाही, तरीही धनगर समाजाने उभा केलेल्या उमेदवाराला बहुमत मिळणार नाही, अशी चर्चा आहे. राज्य सरकारने बारामतीतील सर्वोपचार रुग्णालयाला दिलेल्या अजित पवारांच्या नावाचा मुद्दा पुढे केला. त्यामुळे राजकीय स्टंटबाजी करून काही नेते निवडणूक बिनविरोध न करण्याचं आव्हान देत आहेत, अशाही चर्चांनी जोर धरला आहे.

अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात  निधन झालं.त्यानंतर बारामती विधानसभेच्या रिक्त जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच ही निवडणूक आता बिनविरोध होईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.  राज्य सरकारने बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय सलग्न  सर्वोपचार रुग्णालयास अजित पवारांचं नाव दिलं, हे यामागचं कारण ठरू शकतं. 

Advertisement

या नावाला धनगर समाजातील काही नेत्यांचा विरोध आहे. याच मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या  उपस्थितीत बारामतीत 9 मार्च रोजी निषेध आंदोलन देखील करण्यात आलं होतं. सरकारने या नामांतरासंदर्भात काढलेला अध्यादेश मागे घेतला नाही. तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा इशारा धनगर  समाजातील स्थानिक नेते बापूराव सोलनकर यांनी दिला आहे.

नक्की वाचा >> दिवंगत अजित पवारांच्या जागेवर 23 एप्रिलला मतदान, राहुरी, बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर, निकाल कधी?

पवारांच्या पाठीशी बारामतीकर एकजुटीने उभे राहणार?

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवारही सक्रिया राजकारणात उतरल्या आणि त्यांनी विविध कामे सुरु केली. आता बारामती पोट निवडणुकीच्या माध्यमातून सुनेत्रा पवार बारामतीचे नेतृत्व करणार आहेत.एखाद्या नेत्याच्या बाबतीत अशी काही दुर्दैवी घटना घडली, तर त्या ठिकाणी रिक्त जागेच्या पोटनिवडणुका बहुतांशी बिनविरोध होतात, ही महाराष्ट्रातील परंपरा आहे. त्यामुळे अजित पवारांच्या निधनाच्या दु:खातून अद्यापही न सावरलेल्या सुनेत्रा पवारांना निवडणुकीचा सामना करावा लागणार की पवारांच्या पाठीशी बारामतीकर एकजुटीने उभे राहणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

"ही वेळ राजकारणाची नाही. अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या धक्क्यातून अद्यापही ना बारामती सावरली आहे, ना महाराष्ट्र सावरला आहे. बारामतीतील रुग्णालयाला दादांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे मी धनगर समाजाला आवाहन करतो की, आपण सर्वांनी एकत्र येऊन सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे"अशी प्रतिक्रिया  बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप बांधल यांनी दिली आहे.

नक्की वाचा >> Nashik News: त्र्यंबकेश्वरच्या बेपत्ता विद्यार्थ्यासोबत घडलं खूप भयंकर, नाशिककरांच्या पायाखालची वाळूच सरकली

दुसरीकडे बारामती पोट निवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे."बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असा आमचा प्रयत्न असेल.मात्र,आमच्यावर निवडणूक लादली गेली, तर आम्ही निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत",असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अंतरिम मतदार  यादीनुसार बारामतीत जवळपास 3 लाख 80 हजारांहून अधिक मतदारांची संख्या आहे. 70 ते 75 हजारांच्या आसपास धनगर समाजाचे मतदान आहे.परंतु, धनगर समाजाच्या उमेदवाराला बहुमत मिळण्याची शक्यता धूसरच असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय.