योगेश शिरसाट
महायुतीत घुसमट होत असल्याने एकेकाळी भाजपचे सहकारी असलेल्या नेत्याने आता त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जर महाविकास आघाडी आपल्याला सोबत घेण्यास तयार असेल तर त्यांच्या सोबत जाण्याची तयारी ही त्यांनी दर्शवली आहे. मात्र काही झालं तरी या पुढच्या काळात NDA चं सरकार राज्यात येवू देणार नाही अशी प्रतिज्ञाच या नेत्यानं केलं आहे. हा नेता लोकसभा- विधानसभा निवडणुकीनंतर भाजपवर कमालीचा नाराज आहे. विशेष म्हणजे त्यांनी भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे भाजपवर कमालीचे नाराज आहे. महायुतीत योग्य सन्मान होत नसल्यामुळे ते बाहेर पडले आहेत. त्यांनी आता राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ते संपूर्ण राज्यात दौरे करत आहेत. जानकर यांना मानणारा एक मोठा वर्ग राज्यात आहे. पण भाजप सोबत असताना त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही असा त्यांचा आरोप आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून जानकर यांना ओळखलं जात होतं. पण त्यांच्या ऐवजी भाजपने गोपिचंद पडळकर यांना अधिक संधी दिली. त्याचाही राग जानकरांच्या मनात आहे.
त्याच बरोबर त्यांच्या सोबत असलेल्या सदाभाऊ खोत यांनाही संधी देण्यात आली. पण त्याच वेळी जानकरांना वगळण्यात आलं. त्यामुळे जानकर हे आता महायुतीतून बाहेर पडले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कडून सध्या संघटनेवर भर दिला जात असल्याचं जानकर म्हणाले. अकोल्यात या निमित्ताने त्यांनी पक्षाची बैठक घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या ताकदीवर लढवल्या जातील असं ही त्यांनी या आढावा बैठकीत स्पष्ट केलं.
जर महाविकास आघाडीने जागा दिल्या तर त्यांच्यासोबत जायला तयार आहेत असंही जानकर यांनी स्पष्ट केलं. पण पुन्हा एनडीएचे सरकार राज्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहे असं ही त्यांनी सांगितलं. आपला पक्ष स्वबळावर जास्तीत जास्त जागा कसा जिंकेल याचा प्रयत्न आपण करणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं. संविधान बदलण्याचा डाव असल्याचं ही ते या वेळी म्हणाले. शिवाय ईव्हीएम बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरे जा असं आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे.