सागर जोशी, प्रतिनिधी
Anjali Damania Accuses Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे चिरंजीव निखिल गडकरी यांच्या कंपनीच्या संपत्तीत गेल्या काही महिन्यांत प्रचंड वाढ झाल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. गडकरींनी ‘माझ्या बुद्धीचं मूल्य प्रत्येक महिन्याला 200 कोटी रुपये आहे,' असे जे वक्तव्य केले होते, त्याच वक्तव्याचा धागा पकडून दमानिया यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.
दमानिया यांचा नेमका आरोप काय?
दमानिया यांनी त्यांच्या अधिकृत 'X' अकाउंटवरून केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘नितीन गडकरी म्हणतात की त्यांना पैशांची गरज नाही, कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. ते म्हणतात की, त्यांच्या मेंदूचे मूल्य दर महिन्याला 200 कोटींपेक्षा जास्त आहे. खरं तर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखलं आहे. कारण गडकरींचे पुत्र दररोज 144 कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत.'
( नक्की वाचा : पुण्यात बैलपोळा मिरवणुकीमुळे 9 वर्षांच्या मुलाचा जीव टांगणीला; 'आई'ने मांडला थरारक अनुभव... )
दमानियांनी पुढे यामागचं गणित मांडलं. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, निखिल गडकरी यांची सियान ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाची कंपनी आहे. 25 जून रोजी या कंपनीचे 1,89,38,121 प्रमोटर होल्डिंग शेअर्स होते. या शेअर्सच्या किमतीत प्रति शेअर 76 रुपयांची ची वाढ झाली आहे. या वाढीमुळे एका दिवसात तब्बल 143.92 कोटी रुपयांचा नफा झालाय. निखिल आणि सारंग गडकरी दररोज इतके पैसे कमावतात, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
पवन खेडांच्या आरोपाला गडकरींचे उत्तर
गेल्या काही दिवसांपासून इथेनॉल ब्लेंड फ्यूएल अर्थात ई-20 पेट्रोलची चर्चा सुरू आहे. सरकारने सर्व पेट्रोल पंपांवर इथेनॉल मिश्रित पेट्रोल विक्री अनिवार्य केली आहे. सरकारचा हा निर्णय गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांना इथेनॉल निर्मितीचा फायदा मिळवून देत असल्याचा आरोप काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केला होता. ‘गडकरी कायदा बनवतात आणि त्यांची मुलं त्यातून पैसे कमावतात,' अशी टीका त्यांनी केली होती.
पवन खेडा यांच्या याच टीकेला उत्तर देताना नितीन गडकरी नागपूरमधील एका कार्यक्रमात म्हणाले होते, ‘माझ्या बुद्धीचे मूल्य प्रत्येक महिन्याला 200 कोटी रुपये आहे. पैशांसाठी मी इतक्या खालच्या स्तरावर जाऊ शकत नाही.'
आता याच वक्तव्यावरून दमानिया यांनी गडकरींच्या मुलांच्या कंपनीच्या आर्थिक वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या गंभीर आरोपांनंतर गडकरी यावर काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.