जाहिरात

Pune Traffic: पुण्यात बैलपोळा मिरवणुकीमुळे 9 वर्षांच्या मुलाचा जीव टांगणीला; 'आई'ने मांडला थरारक अनुभव...

Pune Traffic Issue : पुणे शहरातील एका महिलेनं वाहतूक कोंडीचा थरारक अनुभव सांगितला आहे.

Pune Traffic: पुण्यात बैलपोळा मिरवणुकीमुळे 9 वर्षांच्या मुलाचा जीव टांगणीला; 'आई'ने मांडला थरारक अनुभव...
Pune Traffic : पुणे शहरातील 9 वर्षांच्या मुलाच्या आईनं त्यांचा थरारक अनुभव सांगितलाय. (फोटो प्रतिकात्मक / AI)
मुंबई:

Pune Traffic Issue : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भाद्रपद अमावस्येला पारंपरिक बैलपोळा सण साजरा होतो. यंदा, 21 सप्टेंबर रोजी झालेल्या या उत्सवादरम्यान मिरवणुका आणि डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे पुणे शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडी झाली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

याच वाहतूक कोंडीचा अनुभव ट्विटर युझर 'सौसी बँडिट' (प्रियांका जोशी) यांनी त्यांच्या @jopriyu या हँडलवरून शेअर केला आहे. त्यांनी सांगितलेला अनुभव हृदयद्रावक असून, यामुळे शहरातील नियोजन आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुलासाठी ठरलेला प्रवास भयावह अनुभव

जोशी यांच्या 9 वर्षांच्या मुलाची बाणेर येथे लेगो बिल्डिंग कार्यशाळा होती. दुपारी 4 वाजता त्याला सोडल्यानंतर, रात्री 7 वाजता त्याला परत आणण्याची त्यांची योजना होती. वेळेवर पोहोचण्यासाठी त्या संध्याकाळी 6:30 वाजता पाषाण-सूस रोडवरून निघाल्या. हा 6 किलोमीटरचा प्रवास साधारणपणे 15-20 मिनिटांचा असतो. मात्र, बैलपोळ्याच्या मिरवणुकीमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली होती.

ट्विटमध्ये त्या लिहितात, "माझ्या 9 वर्षांच्या मुलाची बाणेर येथे लेगो बिल्डिंग कार्यशाळा होती. आम्ही त्याला दुपारी 4 वाजता सोडले आणि 7 वाजता परत आणण्याची योजना होती.

6:30 वाजता, आम्ही पाषाण-सूस रोडवरून निघालो, जे फक्त 6 किमी दूर आहे. एरवी, हा 15-20 मिनिटांचा प्रवास आहे. पण, बैलपोळ्याच्या दिवशी, जे काही घडले तो एक भयानक अनुभव होता.

( नक्की वाचा : Thane Metro ठाणे मेट्रोचा 'ऐतिहासिक' दिवस; 16,000 कोटींचा प्रकल्प 'ट्रॅक'वर, वाचा 13 लाख प्रवाशांना कसा फायदा )
 

सूसगाव रोडवर वाहतूक पूर्णपणे थांबली होती... रस्त्यावर बैल आणले होते, लोक मोठ्या आवाजात डीजेच्या तालावर नाचत होते. आम्ही मागे फिरलो, नांदे-बालेवाडी रोडवरून जाण्याचा प्रयत्न केला, नंतर मानगाव रोडवरून... पण तीच परिस्थिती. हिंजवडीतून पुढे गेलो... तिथेही रस्ता अडकलेला होता. अनेक गल्ल्यांमधून फिरून, अखेरीस आम्ही रात्री 8:10 वाजता पोहोचलो.

तोपर्यंत, माझा मुलगा नियोजित वेळेपेक्षा एक तास जास्त वाट पाहत होता आणि तो खूप घाबरलेला दिसत होता. सुदैवाने, कार्यशाळेच्या आयोजकाने त्याच्यासोबत थांबून त्याची काळजी घेतली. जर तोही निघून गेला असता तर काय झाले असते, याची कल्पना मी करू शकत नाही.

मला सर्वात जास्त त्रास देणाऱ्या गोष्टी अशा आहेत ....

  • एकही वाहतूक पोलीस कर्मचारी दिसला नाही.
  • सार्वजनिक रस्त्यांवर डीजे/संगीतावर कोणतेही नियंत्रण नव्हते.
  • गर्दीच्या वेळी शहरातील मुख्य रस्ते अडवल्याबद्दल कोणतीही जबाबदारी नव्हती.

सण लोकांना एकत्र आणण्यासाठी असतात, संपूर्ण शहराला वेठीस धरण्यासाठी नाही. मला आशा आहे की ही तक्रार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल जेणेकरून भविष्यात अधिक चांगले नियोजन, देखरेख आणि व्यवस्थापन केले जाईल.''

त्यांनी या ट्विटमध्ये पुणे पोलिसांसहर सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना टॅग करून अधिकाऱ्यांनी भविष्यात अधिक चांगले नियोजन आणि व्यवस्थापन करावे अशी आशा व्यक्त केली आहे.

इतर पुणेकरांचे अनुभव

जोशी यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, अनेक पुणेकरांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. @jayantgourkar यांनी डीजे आणि लाऊडस्पीकर राजकीय पक्षांकडून पुरस्कृत असल्याचा आरोप केला आहे, तर @GANESHANMK1 यांनी महाराष्ट्रात आगामी महानगरपालिका निवडणुकांमुळे सणांचे उत्सव आणि रस्ते अडवण्याचे प्रमाण वाढल्याचे म्हटले आहे.

@bhavnesh123 यांनीही औंध, बाणेर, पाषाण आणि सूससारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती नेहमीच जाणवते असे म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊनही परिस्थिती 'जैसे थे'

पुणे शहरातील वाहतूक कोंडी ही एक जुनी समस्या आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली होती. याविषयी मोठी चर्चाही झाली. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही शहरातील परिस्थिती बदलत नसेल, तर आता पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि पुणेकरांना नागरिकशास्त्राचे धडे देण्यासाठी खरोखरच देवाला अवतार घ्यावा लागेल असं कुणाला वाटलं तर ते चुकीचं होणार नाही. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com