शुभम बायस्कार, प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांचं गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केल आहे. 8 जूनपासून सुरु असलेलं हे आंदोलन कडू यांनी मागं घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. पण, सरकारचे पहिले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. सरकार पक्षातर्फे विनंती घेऊन आलेल्या मृदू आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना रित्या हातानेच परतावे लागले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी राठोड यांना कार्यकर्त्यांचा संताप सहन करावा लागला. राठोड यांनी कडूंच्या मागण्या तातडीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मांडतो. त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती केली खरी, मात्र बच्चू कडूंनी ती फेटाळून लावल्याने उपोषणस्थळावरून बाहेर पडताना कडूंच्या कार्यकर्त्यांनी संजय राठोड यांच्यासमोरच 'संजय राठोड हाय हाय'च्या घोषणा दिल्या.
नेमकं काय घडलं?
बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, तरुणांच्या मागण्यांसाठी 8 जूनपासून हे आंदोलन सुरु आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडून विनंती देखील करण्यात आली. मात्र जोपर्यंत शासन निर्णय जारी होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. तसेच त्यांनी वैद्यकीय उपचार आणि औषधोपचारालाही नकार दिला आहे.
( नक्की वाचा : उद्धव ठाकरे गटाला विदर्भात धक्का, बड्या नेत्याचा 'जय महाराष्ट्र' करत भाजपामध्ये प्रवेश )
त्यातच आज (शुक्रवार, 13 जून) सरकार पक्षाकडून आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेले संजय राठोड यांनीही बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावा अशी विनंती केली. दरम्यान संजय राठोड म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत बच्चू कडूंच्या 17 मागण्या संदर्भात बोलणार आहे. मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत देखील या मागण्यांविषयी चर्चा करू. बच्चू कडूंच्या संपूर्ण मागण्यांवर तातडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा अशी विनंती देखील आपण सरकारला करणार असल्याचे संजय राठोड म्हणाले.
बच्चू कडूंची महाराष्ट्राला गरज आहे. त्यांनी उपोषण मागे घ्याव. आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा उपोषण मागे घेण्यासाठी सांगावे अशी विनंती संजय राठोड यांनी केली. राठोड यांची ही विनंती बच्चू कडूंनी फेटाळून लावली. आमच्या मागण्या संदर्भात तातडीने शासन निर्णय जारी करावा अन्यथा सरकारने आमच्या अंतयात्रेची तयारी करावी अशा शब्दात कडूंनी संजय राठोड यांना सुनावलं.
उपोषण मागे घ्या असं सांगण्याऐवजी आमच्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करा असं म्हणत बच्चू कडूंनी संजय राठोड यांची विनंती फेटाळून लावली. दरम्यान उपोषण स्थळावरून बाहेर पडताना संजय राठोड यांना बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांचा रोष सहन करावा लागला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी 'संजय राठोड हाय हाय' च्या घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.