देवा राखुंडे
अजित पवारांना कधी कुठल्या गोष्टीचा राग येईल हे सांगणे अवघड आहे. त्यांच्या रागीट स्वभावाचा फटका अनेकांना बसला आहे. जाहीर कार्यक्रम असो की कार्यकर्त्यांचा मेळावा असो अजित पवार एकदा रागावले की थेट बोलतात. पत्रकार परिषदांमध्ये ही त्यांचे हे रूप अनेक वेळा पाहायला मिळाले आहे. त्याचा प्रत्येय पुन्हा एकदा बारामतीच्याच एका कार्यक्रमात आला आहे. या कार्यक्रमात अजित पवार भडकले. शिवाय चार शब्द अधिकाऱ्यांनाही सुनावले. बरं त्यावरच त्यांचं भागलं नाही. त्यांनी स्वत:वरही आगपाखड केली. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा संपुर्ण बारामतीत होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज रविवारी बारामती दौऱ्यावर होते. शहरात मोफत कॅन्सर निदान शिबिराच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम सिल्वर ज्युबली उपजिल्हा रुगणालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यांनी रुग्णालयाच्या इमारत बांधकामावरून जाहीर नाराजी व्यक्त केली. या इमारतीला गळती लागली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम रुग्णांवरही होत आहे. सरकारने खर्च करूनही अशा पद्धतीची वास्तू उभारली जात आहे या वरून अजित पवारांनी अधिकारी वर्गाला चांगलेच झापले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी निकृष्ट कामा बद्दल आपली भडास अधिकाऱ्यांवर काढली. मी येताना ही इमारत पाहिली.एकदम खराब दिसली. नवीन तंत्रज्ञान आलं आहे. असं असतानाही इमारतीला गळती लागते. हे होऊच कसं शकतं. इमारतीला जी काही गळती लागली असेल ती काढून घ्या. अशा गोष्टींमुळे माझी मलाच लाज वाटते, की मी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय. अशी ही इमारत आहे. अजित पवारांना नाराजी व्यक्त करताना अधिकाऱ्यांना जाहीर कार्यक्रमातच झापलं.
अजित पवारांनी अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना झापण्याची घटना पहिल्यांदाच होते असं नाही. या आधी ही त्यांनी ज्या ठिकाणी चांगले काम झाले नाही अशा ठिकाणी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना झापलं आहे. जे काम होईल ते अगदी दर्जेदार असलं पाहीजे असा आग्रह अजित पवारांचा नेहमीच राहीला आहे. सरकारी पैशांचा योग्य पद्धतीने वापर झाला पाहीजे असं ही ते म्हणाले. अजित पवार रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.