Buldhana News : काँग्रेसला प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच बसणार हादरा! बडा नेता साथ सोडणार?

जाहिरात
Read Time: 3 mins
बुलडाणा:

संजय तिवारी, अमोल गावंडे, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर झालेल्या पिछेहाटीतून पुढं येण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरु आहे. या पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले. नाना पटोलेंच्या (Nana Patole) जागी बुलडाणाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष बदलला तरी काँग्रेसची परिस्थिती काही बदललेली नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. पुणे जिल्ह्यातले आणखी एक मातब्बर काँग्रेस नेते संग्राम थोपटे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. ही चर्चा सुरु होत असतानाच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसला हादरा बसणार असल्याची शक्यता आहे.  

तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे नेते दिलीप कुमार सानंदा पक्षात अस्वस्थ असल्याचे संकेत देत आहेत. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. नंदा यांचे वर्चस्व असलेले बाजार समिती मधील सभापती आणि संचालकांनी नुकतेच मुंबई येथे एका कार्यक्रमात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सानंदा देखील पक्षांतर करण्याच्या उंबठयावर असल्याची चर्चा आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Sangram Thopate : पुणे जिल्ह्यात होणार राजकीय भूकंप! काँग्रेसचा बडा नेता हाती घेणार भाजपाचं कमळ? )

सानंदा लवकरच बुलडाणा जिल्ह्यात मोठा कार्यक्रम आयोजित करून अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षांतर करतील असे बोलले जात आहेत. यापूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हा देखील त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. ते काँग्रेस सोडून जातील काय, त्यांच्या अन्य पक्षाच्या नेतृत्वाशी वाटाघाटी सुरू आहेत का? हा बुलडाणा जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न आहे.  

काय आहे कारण?

दिलीप सानंदा हे स्वत: पक्ष सोडण्याची शक्यता फेटाळत आहेत. पण,  तीन वेळा आमदार राहिलेले आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात शक्तिशाली समजले जाणारे सानंदा सध्या जिल्ह्यात एकटे पडल्याचं चित्र आहे. हे चित्र नाकारता येत नाही. 

Advertisement

सध्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी आमदार राहुल बोंद्रे मिळून जिल्ह्यातील काँग्रेस चालवत आहेत हे सत्य आहे. यापूर्वी राहुल गांधी जिल्ह्यात आले होते. त्यावेळी सभा सुरू असताना दिलीप सानंदा यांच्या गटाने फटाके फोडल्याने व्यत्यय निर्माण झाला होता. त्यावर जिल्ह्यातील अन्य काँग्रेस नेते त्यांना खासगीत दोष देत होते. 

खामगाव येथील राजकारणात भाजपचे फुंडकर विरुद्ध काँग्रेसचे सानंदा अशीच पारंपरिक लढत राहिली आहे. आता तर आकाश फुंडकर मंत्री झाले असल्याने ते जिल्ह्यातील विकासकामांचा धडाका लावण्यात व्यस्त झाले आहेत. अशावेळी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊन सानंदा यांच्या हाती काय मिळेल? हा प्रश्न आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Water Crisis : पाणी प्रश्न पेटला! सोलापूर आणि फलटण आमने-सामने, शहाजी बापूंनी दिला गंभीर इशारा )
 

बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसला गळती

सानंदा यांच्याविषयी या चर्चा सुरू होण्यास तसेच सबळ कारण आहे. यापूर्वी मुकुल वासनिक यांचे अनुयायी असलेले आणि नंतर राहुल गांधी यांच्या निकटवर्ती गोटात सामील झालेले हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले तेव्हापासून बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसला गळती लागली आहे, हे विशेष.

यावर्षी 13 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर सपकाळ यांच्या  मतदार संघातूनच काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आऊटगोईंग सुरु आहे.  

सपकाळांच्या नियुक्तीच्या अवघ्या बारा दिवसांनंतर 25 फेब्रुवारी रोजी मातंग समाजाचे नेते, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विजय अंभोरे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांचे अनुयायी आणि अण्णाभाऊ साठे फाऊंडेशन चे कार्यकर्ते सोबत. मुकुल वासनिक यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे अंभोरे यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश घेतलेला आहे.

23 मार्च रोजी जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्तारसिंग  राजपूत यांचे सुपुत्र ॲड गणेशसिंग राजपूत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यांचे वडील मुख्तारसिंग हे आधी शिवसेनेत होते आणि त्यांनी आमदारकीची निवडणूक देखील लढवली होती, हे येथे उल्लेखनीय.

जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षातील राजकारणात एकटे पडल्याची भावना झालेले दिलीप सानंदा पक्ष सोडून जाण्याची घोषणा करतात काय, त्याकडे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे.
 

Topics mentioned in this article