मंगेश जोशी
जागा एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती जवळपास सर्वच मतदार संघात झाली आहे. शिवाय मतदार संघ एक आणि दावा करणारे पक्ष अनेक अशीही ही स्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक मतदार संघात चढाओढ आहे. शहकाटशहाचे राजकारण सुरू आहे. दबाव तंत्रही वापले जाते. उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल अपक्ष लढण्याची तयारी उमेदवार दर्शवत आहेत. यातून आक्रमक वक्तव्यही केले जात आहेत. आता जळगावच्या पाचोऱ्यात तर शिवसेना शिंदे गट विरूद्ध भाजप हे एकमेकांना भिडल्याचे चित्र आहे. त्यातून टोकाची वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे वरच्या पातळीवर जरी सर्व काही ठिक आहे असे दाखवले जात असले तरी स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांमधून विस्तवही जात नसल्याची स्थिती आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुकीपूर्वी जळगावमध्ये महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेनेतील संघर्ष हा वाढला आहे. भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून मिळालेली मतं व पाठीशी असलेला जनाधार या आधारावर विधानसभा लढवण्याच्या निर्णयावर अमोल शिंदे हे ठाम आहेत. त्यांनी शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांना विरोध दर्शवला आहे. शिवाय त्यांच्याच विरोधात दंडही थोपटले आहे. हे दोघेही सध्या महायुतीत आहेत. त्यामुळे या दोघांच्या भांडणातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न पक्षश्रेष्ठीं समोर आहे.
ट्रेंडिंग बातमी - मनसेचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला, तर्क वितर्कांना उधाण
अमोल शिंदे हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. मागील निवडणुकीत किशोर पाटील यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष अमोल शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अमोल शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता. शिवसेनेचे किशोर पाटील हे अवघ्या दोन हजार मतांनी विजयी झाले होते. मात्र आता पुन्हा बंडखोरी करण्याचे अमोल शिंदे यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे जागा वाटपा आधीच महायुतीत पाचोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे.
ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसचे दोन आमदार 'हाता' ची साथ सोडणार? मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अर्थ काय?
भाजपच्या अमोल शिंदे यांनी दंड थोपटल्याने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील हे नाराज झाले आहेत. त्यांनी थेट भाजप नेत्यांवर पाठीत खंजीर खुपसण्याचा आरोप केला आहे. अमोल शिंदेंना भाजपचे तिकीट द्या, मी मैत्रीपूर्ण लढतीला तयार असल्याचे थेट आवाहन किशोर पाटील यांनी दिले आहे. शिवाय त्यांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टिका केली आहे. किशोर पाटील यांनी मागिल वेळी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यात ते दोन हजार मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी युती असूनही भाजपने काम केले नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान शिवसेनेत फुट पडण्यानंतर किशोर पाटील यांनी शिंदेंना साथ दिली. त्यामुळे या मतदार संघावर त्यांनी दावा केला आहे.
पाचोऱ्यात भाजप विरूद्ध शिवसेना शिंदे गट असे चित्र निर्माण झाले आहे. अमोल शिंदे आणि किशोर पाटील या दोघांनी ही एकमेकां विरोधात लढण्याचे मन बनवले आहे. काही झाले तरी इथे बंडखोरी होणार असेच चित्र आहे. अशा वेळी भाजपमध्ये कोणीही बंडखोरी करणार नाही. मात्र तिकीट मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवार जाहीर होण्याची वाट पाहण्याचा सल्ला त्यांनी या दोघांनाही दिला आहे. शिवाय बंडखोरी बाबत अधिक बोलणे गिरीश महाजनांनी टाळले आहे.
ट्रेंडिंग बातमी - एमआयएमचा मोठा डाव? थेट ऑफर, महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार?
गिरीश महाजन यांची सारवासारव आणि अमोल शिंदे यांची बंडखोरीची भाषा यावरून शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. जर कोणी बंडखोरीची भाषा करत असेल तर ती अजिबात सहन केली जाणार नाही, असा इशाराच शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटलांनी दिला आहे.एकीकडे जळगावमध्ये अवघ्या एक दिवसापूर्वी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची एकाच वाहनातून रॅली काढण्यात आली. त्यातून महायुती एकसंध असल्याचे दाखवले गेले. पण प्रत्यक्षात काही वेगळीच स्थिती असल्याचे पाचोऱ्यात तरी दिसत आहे.