नारायण राणेंच्या अडचणी वाढणार? कोर्टाने थेट नोटीस पाठवली, नक्की प्रकरण काय?

राणे यांनी मतदारांना धमकावून व पैसे वाटप करून फसव्या मार्गाने निवडणूक जिंकली आहे. याबाबत तक्रार दाखल करूनही त्याची दखल घेतली नाही.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपचे नारायण राणे यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला. त्यांच्या या विजयाला विनायक राऊत यांनी कोर्टा आव्हान दिले आहे. हा विजय भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून मिळवला असल्याचा आरोप त्यांनी कोर्टात केलेल्या याचिकेत केला आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमुर्ती सारंग कोतवाल यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी त्यांनी नारायण राणे आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. शिवाय 12 सप्टेबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. विनयकुमार खातू, ॲड.किशोर वरक यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत नारायण राणे व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक जिंकण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा वापर केल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांना शासकीय यंत्रणेतील लोकांनी सहकार्य केल्याचा ही आरोप केला आहे. राणे यांनी मतदारांना धमकावून व पैसे वाटप करून फसव्या मार्गाने निवडणूक जिंकली आहे. याबाबत तक्रार दाखल करूनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातील निवडणूक रद्द करून नारायण राणे यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - उद्धव ठाकरे यांचं शरद पवार, नाना पटोलेंसमोरच मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा जाहीर प्रचार 5 मे 2024 रोजी संपला होता. त्यानंतरही नारायण राणे यांचे समर्थक व बीजेपी कार्यकर्ते डमी ईव्हीएम मशीनवर "कमळ" हे निवडणूक चिन्ह दाखवून प्रचार करत होते. तसेच काही ठिकाणी मतदारांना पैसे वाटत होते. याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. लोकप्रतिनिधी कायद्या नुसार निवडणुकीच्या 48 तास अगोदर प्रचाराची कामे थांबवावी लागतात. राऊत यांनी उच्च न्यायालयाकडे सदर व्हिडिओच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी नव्याने निवडणूक घेण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी केली आहे. शिवाय या याचिकेची सुनावणी होई पर्यंत राणेंवर संसदेत काम करण्यासाठी निर्बंध घालण्यात यावेत अशी मागणी केली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा', उद्धव ठाकरेंच्या मागणीमागचं राजकारण काय?

नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी 13 एप्रिल 2024 रोजी घेतलेला जाहीर सभेत मतदारांना धमकावले. असा आरोपही केला आहे. "भाजपच्या उमेदवाराला विशिष्ट भागातून आघाडी मिळाली नाही तर त्यांना निधी मिळणार नाही" हा थेट मतदारांना धोका होता असंही ते म्हणाले आहेत. याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे  तक्रार केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीकडे निवडणूक आयोग लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
 

Advertisement