काँग्रेसचे विशाल पाटील यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज, माजी आमदार विलासराव जगताप यांचा विशाल पाटलांना पाठिंबा आणि काँग्रेसकडून सांगलीसाठी सुरू असलेले प्रयत्न पाहता चंद्रहार पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी प्रचारसभेवेळी केलेल्या वक्तव्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
आज जर तुम्हाला माझी अडचण वाटत असेल तर मी जाहीरपणे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार असल्याचं चंद्रहार पाटील म्हणाले. 'मात्र शेतकऱ्याचा मुलगा लोकसभेच्या निवडणुकीसाठी लायक नाही, माझ्या पाठीमागे कोणता कारखाना नाही, माझे वडील, आजोबा कोणी मुख्यमंत्री नव्हते, माझे वडील आमदार-खासदार नव्हते म्हणून मला उमेदवारी दिली जाणार नाही, असं काँग्रेसने जाहीर करावं. असं केलं तर जाहीरपणे मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतो, अशा शब्दात चंद्रहार पाटलांनी आपला रोष व्यक्त केला.
हे ही वाचा-सांगलीत भाजपला मोठा धक्का, विलासराव जगतापांचा राजीनामा; विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर
सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील तिढा अद्याप सुटलेला नाही. चर्चा सुरू असतानाच या जागेवरुन शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. अशाही परिस्थितीत काँग्रेसमधील नेते या जागेवरुन निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. काँग्रेसकडून विशाल पाटील या जागेवरुन इच्छूक आहेत.
आज विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून उद्या काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती आहे. भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी थेट पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसच्या विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे विशाल पाटलांचं पारडं जड झालं आहे.