चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी आज जिल्ह्यात मतदान होत आहे. तब्बल 13 वर्षानंतर आज निवडणूक होत आहे. एकूण 21 संचालक या निवडणुकीत निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढत होत आहे. आतापर्यंत 21 पैकी 13 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित आठ जागांसाठी आज प्रत्यक्ष मतदान सुरू आहे. अलीकडेच बँकेत झालेल्या मेगा भरतीमध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा धुरळा उठला होता. त्यामुळे बँक चांगलीच चर्चेत आली होती.
या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील दोन मोठे नेते आषाढी एकादशीच्या निमित्ताने एकत्र आले. आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ही निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. वडेट्टीवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी आपल्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. तर खासदार धानोरकर या महिला गटातून बिनविरोध निवडून आल्या आहेत.
या दोघांच्या एकत्र येण्याने काँग्रेसची स्थिती भक्कम झाल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार कीर्ती भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांनीही आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी केली आहे. शुक्रवारी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याच वेळी सर्व चित्र स्पष्ट होईल. पण यानिमित्ताने काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांची झालेली दिलजमाई कार्यकर्त्यांना सुखावणारी ठरली आहे.
जिल्हा बँक आपल्या ताब्यात राहावी यासाठी काँग्रेस आणि भाजपचे प्रयत्न आहे. त्यात काँग्रेसने आता बँक जिंकण्यासाठी जोर लावला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिवाय त्यांनी विजय वडेट्टीवार यांचे ही मन वळवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसची बाजू बळकट दिसत आहे. लोकसभेला चंद्रपूरमध्ये काँग्रेसला साथ मिळाली होती. पण विधानसभेला काँग्रेसने इथे सपाटून मार खाल्ला होता. त्यामुळे ही निवडणूक आता काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे.