ओंकार कुलकर्णी, धाराशिव
Tuljapur Drugs case: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला आहे. विनोद उर्फ पिंटू गंगणे यांच्याकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळेंनी 'विनोद इकडे ये', म्हणत गंगणेच्या खांद्यावर हात ठेवत कौतुक केलं. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीला जाहीर कार्यक्रमात मानाचे पान देण्यात आले होते.
महसूल मंत्र्यांच्या धाराशिव दौऱ्याच्या निमित्तानं जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी विनोद उर्फ पिंटू गंगणेला व्यासपीठावर महसूलमंत्र्यांकडून शाबासकीची थाप देण्यात आली.
( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरुन तरुणानं मारली उडी, धक्कादायक आरोपानं खळबळ )
तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला 1865 कोटींचा निधी मंजूर करून दिला म्हणून हा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सत्काराला भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील देखील उपस्थित होते. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींवर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. बावनकुळेंच्या दौऱ्यानिमित्तानं त्याचं दर्शन झालं आहे.
काय आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरण?
तुळजापूर ड्रग्ज तस्करीप्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याची नावे काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजा यांनी पोलिसांकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी, त्यातील 21 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु होता.