राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिपद मिळालं आहे. आज 20 मे रोजी राजभवनात सकाळी 10 वाजता ते मंत्रिपदाची शपथ घेतील. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या जागी भुजबळ यांची निवड होणार असल्याची माहिती आहे. भुजबळांना धनंजय मुंडे यांचेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय दिलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज होते. त्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या रिक्तपदी दुसऱ्या ओबीसी चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा राजभवनात होणार असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक महायुतीचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - Devendra Fadnavis: गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा सादर करा, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद मिटणार?
छगन भुजबळांच्या मंत्रिपदामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा राष्ट्रवादीचा दावा अधिक मजबूत होणार आहे. नाशिक जिल्ह्यातून मंत्रिपदाची शपथ घेणारे छगन भुजबळ राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री ठरतील. नाशिक जिल्ह्याला भुजबळांच्या रुपात चौथे मंत्री मिळणार असून दादा भूसे वगळता इतर दोन माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ राष्ट्रवादीचेच मंत्री आहेत. भुजबळांच्या मंत्रिपदामुळे नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा वाद मिटणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.