राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. भुजबळांची नाराजी काही कमी होताना दिसत नाही. तरुणांना संधी द्यायची होती. त्यामुळे काही निर्णय घ्यावे लागले. अशा स्थिती कोणी वेगळा अर्थ काढू नये असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जर तरुणांना संधी द्यायची होती तर मला निवडणूक लढवायला का सांगितली? असा प्रश्नही भुजबळांनी उपस्थित केला. शिवाय तरुणांची व्याख्या काय? 67 आणि 68 वर्षाचे आहेत ते पण तरुण म्हणायचे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी अजित पवारांच्या मंत्रिपदावरच अप्रत्यक्ष पणे आक्षेप नोंदवला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तरुणांना संधी द्यायची होती म्हणून भुजबळांना वगळलं. त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल. त्यांना केंद्रात पाठवलं जाईल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. त्यातून भुजबळांची नाराजी दुर होईल असं अजित पवारांना वाटलं होतं. पण तसं होण्या ऐवजी छगन भुजबळ हे अजून आक्रमक झाले. तरुणांना संधी द्यायची होती ही चांगली गोष्ट आहे. पण तरुणांची व्याख्या काय असा प्रश्न त्यांनी केला. 67 आणि 68 वर्षांच्यांना तरुण म्हणायचं की नाही अशी विचारणा करत त्यांनी अजित पवारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केला. असं असेल तर काही वयाच्या काही तरी मर्यादा टाकणे गरजेचे आहे. नाही तर उघड पणे सांगा.
आपण पक्षाला या आधीच सांगितलं होतं. आपल्याला लोकसभेत पाठवा. लोकसभेची सर्व तयारीही केली होती. पण तिथेही आपल्याला थांबवण्यात आलं. राज्यसभेच्या दोन निवडणुका झाल्या. पण दिल्ली ऐवजी तुमची गरज राज्यात आहे असं सांगितलं गेलं. असं असताना आता ताबडतोब गरज कमी झाली का? अशी विचारणा भुजबळ यांनी केली. आता सांगितलं जात आहे तुम्ही राज्यसभेत जा. राज्यसभेत जा म्हणजे विधानसभेचा राजीनामा द्या. पण मी राजीनामा का देऊ असं छगन भुजबळ म्हणाले. आधीच आपल्याला याबाबत कल्पना का देण्यात आली नाही असंही ते म्हणाले.
कोणत्याही ठिकाणी सिनिअर आणि ज्युनिअर याची सांगड घातली जाते. त्याचे काही नियमही असतात. अगाच काही करायचं म्हणून करणं चुकीचं आहे. एकीकडे तरुणांना संधी द्यायची आहे असं सांगितलं जात आहे. असं होतं तर मग मला का उभं केलं. मला मंत्रिमंडळात घेतलं नाही त्या मागे काही तरी असावं अशी शंकाही भुजबळ यांनी व्यक्त केली. मी जर मंत्रिमंडळात नसेल तर ओबीसींबाबत तिथे कोण बोलणार अशी विचारणा ओबीसी करत आहेत असंही भुजबळ म्हणाले. अजित पवार हे माझ्या ऐवढेच जुने आहेत. वय हा प्रश्न होवू शकत नाही. मी मंत्रिपदासाठी हापापला नाही. दरम्यान पुढील भूमीका काय घ्यायची हे ठरवायला आपल्याला आणखी वेळ लागणार असल्याचे भुजबळ म्हणाले.
मंत्रिमंडळात ज्यावेळी मंत्र्यांची नावं दिली, त्यामध्ये काही मान्यवरांना थांबायला सांगितलं. असं अजित पवार म्हणाले होते. कधी काही नवी लोकांनाही संधी द्यावी लागते. जुन्यांना इथं संधी न देता केंद्रात संधी देण्याचा विचार केला आहे. योग्य मानसन्मान देण्यात अजित पवार कुठे ही कमी पडणार नाही. त्यामुळे कारण नसताना गैरसमज होतील असं वक्तव्य करणे योग्य नाही असे अजित पवार यांनी भुजबळांचे नाव न घेता त्यांना सुनावले. ते बारामती इथं आयोजित मेळाव्यात बोलत होते.