CM Devendra Fadnavis on on Varsha Bungalow : राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर (5 डिसेंबर 2024) आता दोन महिने झालेले आहेत. त्यानंतरही फडणवीस मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यात राहयला गेलेले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यातच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) यांनी याबाबत धक्कादायक वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे. या सर्व चर्चांवर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वर्षा बंगल्यात पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहात होते. शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत. तर फडणवीस यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर मला तिथं जायचं आहे. त्या बंगल्यात त्यापूर्वी काही लहान-मोठी कामं सुरु होती.
माझी मुलगी दहावीला आहे. दहावीची परीक्षा 17 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर आपण वर्षा बंगल्यावर शिफ्ट होऊ, असं मुलीनं सांगितलं. मुलीची परीक्षा झाल्यावर मी वर्षा निवासस्थानी शिफ्ट होणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. या विषयावर वेड्यासारख्या चर्चा सुरु आहेत. त्यावर माझ्या सारख्या माणसाने उत्तरही देऊ नये, असं वाटतं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
( नक्की वाचा : PM Modi Speech : राजीव, राहुल आणि केजरीवाल, पंतप्रधान मोदींचा संसदेत 'ट्रिपल अटॅक' )
राऊत यांचा आरोप काय?
संजय राऊत यांनी या विषयावर बोलताना धक्कादायक वक्तव्य केलं होतं. 'शिंदे गटात सगळे लिंबूसम्राट आहे. माझ्या असं कानावर आलं आहे की भाजपच्या अंतर्गत गटात अशी चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करण्यात आलं आहे. तिथे कामाख्या देवीवरुन जे रेडे कापले त्या रेड्याची शिंग पुरली आहेत. मुख्यमंत्रिपद कुणाकडे टिकू नये यासाठी मंतरलेली शिंग आणली आहेत. आता हे खरं आहे की खोटं माहित नाही. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मुलन कायदा मानणारी लोक आहोत' असं राऊत म्हणाले होते.
'वर्षा मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे. हा महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे? तिथे नेमकं काय झालं आहे? कुणामुळे झालं आहे? मुख्यमंत्री एवढे अस्थिर आणि अस्वस्थ का आहेत? हे महाराष्ट्राला समजायला हवं,' अशी मागणीही त्यांनी केली होती.