Waqf Amendment Bill : वक्फ (सुधारणा) विधेयक 2025 लोकसभेत सादर करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाचं स्वागत केलंय. पूर्वी झालेल्या चुकांमुळे काही लोकं त्याचा फायदा घेत होते, आणि मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते. त्यांच्यावर यामुळे टाच येणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून निर्णय केला तर ते विधेयकाच्या बाजूनं निर्णय करतील. पण ते तसं का करणार नाहीत, याचं कारण त्यांनी यावेळी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर झालं याचा आनंद आहे. हे विधेयक नक्की पास होईल याचा विश्वास आहे. मूळ कायद्यामध्ये अमर्याद अधिकार होते. चुकीच्या पद्धतीनं निर्णय घेतला तर त्या विरोधात न्यायालयात जाण्याची मुभा नव्हती. आता नव्या बिलानं ती मुभा दिली आहे. चुका सुधारण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे वक्फ बोर्डात आता महिलांना प्रतिनिधित्व मिळणार आहे. हे अतिशय पुरोगामी पाऊल आहे.
कोणत्याही समाजाच्या विरोधात हे विधेयक नाही. तर पूर्वी झालेल्या चुकांमुळे काही लोकं त्याचा फायदा घेत होते, आणि मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते. त्यांच्यावर यामुळे टाच येणार आहे. मला विश्वास आहे, ज्यांची सदसद विवेकबुद्धी जागृत आहे ते सर्व या विधेयकाला पाठिंबा देतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : Waqf Bill : 'आज बाळासाहेब असते तर असं भाषण केलं असतं का?' श्रीकांत शिंदेंचा 'उबाठा'ला सवाल )
वक्फ बोर्डाची जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रचार विरोधकांकडून सुरु आहे, त्याचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी समाचार घेतला. विरोधक याबाबतचा एकही पुरावा किंवा मुद्दा संयुक्त समितीसमोर आणू शकले नाहीत. ते संयुक्त समितीमध्ये निरुत्तर झाले. 25 राज्यांनी ज्या सुधारणा दिल्या त्याचा विचार करुन या सुधारणा केल्या आहेत. जेव्हा काही उरत नाही त्यावेळी याबाबतच्या गोष्टी मांडल्या जातात, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून निर्णय केला तर ते विधेयकाच्या बाजूनं निर्णय करतील. पण, त्यांना फक्त लांगूलचालन करायचं आहे. केवळ मतांची लाचारी आहे आणि पाय चाटायचे आहेत, असं त्यांनी सांगितलं.