जाहिरात

Waqf Bill : 'आज बाळासाहेब असते तर असं भाषण केलं असतं का?' श्रीकांत शिंदेंचा 'उबाठा'ला सवाल

वक्फ (सुधारणा) विधेयक 2025 लोकसभेत सादर करण्यात आलं. या विधेयकावर झालेल्या चर्चेच शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधेयकाला पाठिंबा दिला.

Waqf Bill : 'आज बाळासाहेब असते तर असं भाषण केलं असतं का?' श्रीकांत शिंदेंचा 'उबाठा'ला सवाल
नवी दिल्ली:

वक्फ (सुधारणा) विधेयक 2025 लोकसभेत सादर करण्यात आलं. या विधेयकावर झालेल्या चर्चेच शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. त्यांनी लोकसभेत केलेल्या भाषणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटानं मांडलेल्या भूमिकेवर जोरदार टीका केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते तर तुम्ही असं भाषण केलं असतं का? असा प्रश्न शिंदे यांनी यावेळी विचारला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले शिंदे?

आज सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. पहिल्यांदा 370, त्यानंतर ट्रिपल तलाक आणि CAA नंतर गरीब मुस्लिमांसाठी वक्फ विधेयक सादर करण्यात आलं आहे. मला हा प्रश्न विचारायचा आहे की,  आज हिरवं जाकीट बुधवारसाठी घातलं आहे की, वक्फसाठी अरविंद सावंत यांनी हिरवं जाकीट घातलं आहे.

मला 'उबाठा ला प्रश्न विचारयचा आहे की, आज बाळासाहेब असते तर असं भाषण तुम्ही केलं असतं का? तुमच्याकडं चुकांना सुधारण्याची सुवर्णसंधी होती. स्वत:ची विचारधारा जिवंत ठेवण्याचा, ज्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आंदोलन केलं होतं. पण UBT नं ती विचारधारा आगोदरच बुलडोझरखाली चिरडली आहे, अशी टीका त्यांनी केली. 

बाळासाहेबांची विचारधारा स्पष्ट होती. हिंदुत्वाची रक्षा, देशाची एकता आणि अन्य धर्मियांसाठी सन्मान ही त्यांची विचारधारा होती. आज बाळासाहेब इथं असते आणि त्यांनी उबाठाचे भाषण वाचलं असतं तर त्यांच्या आत्म्याला त्रास झाला असता. 

उबाठानं वक्फ बोर्डात गैर मुस्लीम सदस्य नको, अशी मागणी केली आहे. त्याची त्यांनी इथं वकिली केली. बाळासाहेब फक्त हिंदुत्वासाठी लढले मला वाटतंय यांना फक्त हिंदुत्वाची अ‍ॅलर्जी आहे. आज ठाकरे गट औरंगजेबाच्या विचारावर चालतोय. ते औरंगजेबाची वकिली करत आहेत. यांनी पालघरमधील साधू हत्याकांडावर कधी पत्र लिहिलं नाही. आज औरंगजेबाचा मुद्दा निघाला तर यांची अस्वस्थता वाढली आहे.

( नक्की वाचा : Waqf Bill : वक्फ विधेयकाची गरज का आहे? लोकसभेत केंद्र सरकारनं सांगितली 5 महत्त्वाची कारणं )
 

वक्फच्या नावाखाली ज्या गरीब मुस्लिमांचा अधिकार हिसकावण्यात आला त्यांच्यासाठी हे विधेयक आधार आहे. विरोधकांनी त्यांचा कायम व्होटबँक म्हणून वापर केला. शहाबानो प्रकरणात कोर्टानं त्यांना न्याय दिला. पण, काँग्रेसनं त्यांचा हक्क हिरावून घेतला. मुस्लीम समाजाच्या विकासासाठी सादर केलेल्या सच्चर आयोगाच्या शिफारशींवर आठ वर्ष काँग्रेस सरकारनं अंमलबजावणी केली नाही. 

'इंडी' आघाडीचे सर्व घटकपक्ष या विधेयकाला विरोध करत आहेत. पण, याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी वक्फमधील घोटाळ्याची आपल्या कार्यकाळात करण्याची मागणी केली होती, याची आठवण शिंदे यांनी करुन दिलं. वक्फची जमिनी लाटण्याचं काम विरोधकांच्या राजवटीमध्ये झाल्याचं त्यांनी सांगितलं. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवीगाळ करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत उबाठा गटात नाही, असा टोला शिंदे यांनी लगावला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: