लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पक्षाचे तेरा खासदार निवडून आले. तर एक बंडखोर उमेदवारही निवडून आला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळाली यासाठी इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पक्षाने राज्यातल्या 288 मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय या अर्ज विक्रीतून पक्ष निधीतही भरभरून पैसे जमा झाले आहेत.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. असं असलं तरी काँग्रेसने मात्र राज्यातल्या 288 मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्यातून पक्ष चाचपणीही करत आहे. 288 जागांसाठी राज्यभरातून जवळपास 2500 पेक्षा जास्त इच्छुकांनी हे अर्ज भरले आहेत. एका अर्जासाठी 20,000 एवढी रक्कम आकारली गेली होती. या अर्जातून जवळपास 4 कोटींचा पक्षनिधी जमा झाला आहे.
ट्रेंडिंग बातमी - मविआचं ठरलं, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार!
अर्ज विक्री करताना वर्गवारी करण्यात आली होती. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवाराला एका अर्जासाठी 20 हजार रूपये आकारले जात होते. तर महिला व आरक्षित प्रवर्गासाठी प्रत्येकी 10 हजार रुपयांचा अर्ज होता. ही रक्कम पक्षाने निश्चित केली होती. त्यानुसार इच्छुकांनी केलेल्या अर्जाच्या खरेदीतून काँग्रेसच्या तिजोरीत जवळपास 4 कोटींचा निधी गोळा झाला आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट होती.
ट्रेंडिंग बातमी - बारामतीतून अजित पवारांची माघार? निवडणूक न लढण्याचे कारण काय?
काँग्रेसने राज्यातल्या 288 जागांचा आढावा घेतला आहे. त्यातील जास्तीत जास्त जागा लढण्याचा काँग्रेसचा मानस आहे. लोकसभेला सर्वात मोठा पक्ष काँग्रेस झाल्याने विधानसभेत जास्त जागा लढाव्यात अशी पक्षातील नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेस शंभर पेक्षा जास्त जागा लढेल अशी स्थिती आहे. याबाबचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. त्या दृष्टीने काँग्रेसने मात्र आपली तयारी सुरू केली आहे. ज्या प्रमाणात इच्छुकांची झुंबड उडाली आहे ते पाहात काँग्रेसमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून येत आहे.