Sangram Thopate News : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील माजी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. आता त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यातील दिग्गज काँग्रेस नेते संग्राम थोपटे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काही दिवसांपूर्वीच होणार होता प्रवेश
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही दिवसांपूर्वी रायगडावर आले होते. त्यावेळीच थोपचे भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण, त्यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विरोध केला होता. थोपटे यांच्या मतदरासंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार आहे. त्यावेळी लांबलेला पक्षप्रवेश आता लवकरच होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत संग्राम थोपटे?
संग्राम थोपटे हे पुणे जिल्ह्यातील राजकाराणातील बडं नाव आहे. ते तीन वेळा भोर मतदारसंघाचे आमदार होते. त्यांचे वडील आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी सहा टर्म या मतदारसंघाची आमदारकी भूषविली आहे. भोर मतदारसंघात त्यांचं चांगलाच प्रभाव आहे. पण मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला होता.
( नक्की वाचा : Explained : उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या आवाजाची गरज का? AI भाषणाचा 'मार्मिक' प्रभाव होईल? )
पवार कुटुंबीयांसोबत वाद आणि दिलजमाई
भोरमधील थोपटे घराणे आणि शरद पवार यांच्यातील राजकीय वाद देखील संपूर्ण राज्याला प्रसिद्ध आहे. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचे तीव्र मतभेद होते. मागील विधानसभेच्या कालावधीमध्ये नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर संग्राम थोपटे यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होतं. पण, शरद पवारांच्या विरोधामुळेच थोपटे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, अशी चर्चा आहे.
त्यानंतर मागील वर्षी झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी भोरमध्ये जाऊन स्वत: अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन नेत्यांमध्ये दिलजमाई झाली. बारामती लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा सुप्रीया सुळे यांना झाला होता.
गैरव्यवहारात आरोप
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनांमधील गैरव्यहारात संग्राम थोपटे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. त्याची 14 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात वित्त विभाग जे शपथपत्रक सादर करणार आहे ते संग्रमा थोपटेंच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वराचं मंदीर संग्राम थोपटे यांच्या संस्थेच्या ताब्यात आहे. त्यावरही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून वाद सुरु आहे. हे मंदिर ताब्यात घेऊन तिथं मोठी शिवसृष्टी उभा करु असं भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं.