बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं शनिवारी (24 ऑगस्ट) बंदचं आवाहन केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं हा बंद बेकायदेशीर असल्याचं जाहीर केल्यानं महाविकास आघाडीला धक्का बसलाय. आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्वप्रथम बंद मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यापाठोपाठ काँग्रेसनंही या बंदबाबत भूमिका जाहीर केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारच्या महाराष्ट्र बंदबाबत पक्षाची भूमिका जाहीर करणारं ट्विट केलं आहे. 'मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून बदलापूरच्या चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या विरोधात उद्या सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध करणार आहेत. मी स्वतः उद्या सकाळी 11 वाजता ठाणे येथे या आंदोलनात सहभागी होणार आहे.' असं ट्विट पटोले यांनी केलं आहे.
नाना पटोले यांनी या ट्विटमधून थेट प्रत्यक्षपणे नाही तर अप्रत्यक्षपणे बंदमधून माघार घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याचबरोबर राज्याचील पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना शनिवारी निषेध आंदोलन करण्याचा आदेश दिला आहे.
काय म्हणाले होते पवार?
यापूर्वी शरद पवार यांनी बंद मागे घेण्याची विनंती ट्विट करत केली होती. दलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता."
( नक्की वाचा : 'महाराष्ट्र बंद मागे, पण...', उद्धव ठाकरे काय म्हणाले? )
"उद्याचा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते', असं पवार यांनी ट्विट करत म्हंटलं होतं.