Dhananjay Munde Political Journey : राज्यात भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवण्यात दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं मोठं योगदान आहे. मुंडे यांनी सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीमध्ये राज्यात भाजपा वाढवला. पक्षासाठी व्होटबँक तयार केली. राज्य भाजपाचा ब्राह्मणी चेहरा बदलला. आज भाजपाला भक्कम साथ देणाऱ्या ओबीसी समाजात पक्ष रुजवण्यात गोपीनाथ मुंडे यांचे कष्ट कारणीभूत आहेत. मुंडे यांचे पुतणे धनंजय यांचाही राजकीय प्रवास काकांसारखाच संघर्षाचा राहिला आहे. धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतलीय. गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणून एकेकाळी त्यांच्याकडं पाहिलं जात असे. ते धनंजय मुंडे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्वात विश्वासू नेते आहेत. आज 15 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
धनंजय मुंडेंची वैयक्तिक माहिती
धनंजय मुंडे यांचा जन्म 15 जुलै 1975 रोजी झाला. ते गोपीनाथ मुंडे यांचे सख्खे पुतणे. त्यांचे वडील पंडितअण्णा मुंडे हे बीड जिल्ह्यातल्या राजकारणात नेहमी सक्रीय होते. धनंजय यांनी शालेय शिक्षण परळीत तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधून पूर्ण केलं.
धनंजय मुंडे यांच्या पत्नीचं नाव जयश्री मुंडे आहे. त्या दोघांना तीन मुली आहेत. त्याचबरोबर करुणा शर्मा यांच्याशी देखील सहमतीनं संबंध असल्याची कबुली धनंजय मुंडे यांनी काही वर्षांपूर्वी दिली.त्यावेळी धनंजय हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांची राजकीय कारकीर्द संकटात सापडली होती. पण, या अवघड प्रसंगातूनही त्यांनी स्वत:ला सुखरुप बाहेर काढलं. करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना 2 मुलं आहेत. 2024 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात त्यांनी पहिल्यांदा त्या दोघांचा उल्लेख केला होता.
भाजपा का सोडली?
धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द भारतीय जनता पार्टीमध्ये काका गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली. काकांप्रमाणेच भाषण करण्याची आणि झोकून देऊन संघटना बांधण्याची कला धनंजय यांनी आत्मसात केली. त्यामुळे कमी कालावधीतच बीड जिल्ह्यातील तरुणांमध्ये त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली.
धनंजय मुंडे 1999 पासून राजकारणात सक्रीय आहेत. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद गटनेते आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून त्यांनी बीड जिल्ह्यात भाजपाकडून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही धनंजय यांनी काम केलं आहे.
गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून धनंजय यांच्याकडं पाहिलं जात होतं. पण, 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंडेंनी त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांना परळी विधानसभेची उमेदवारी दिली. पंकजा यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर धनंजय मुंडे नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्याचा गोपीनाथ मुंडे यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. धनंजय यांनी 2012 साली भारतीय जनता पार्टीचा त्याग करत शरद पवारांच्या राष्ट्रवा्दी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
( नक्की वाचा : पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते,शरद पवारांनी परळीत सांगितला 'तो' किस्सा )
विरोधी पक्षनेतेपद ते फसलेलं बंड...
गोपीनाथ मुंडे यांचं 2014 साली अपघाती निधन झालं. त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात परळीमधून विधानसभा निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत धनंजय मुंडे पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत संस्थांमधील निवडणुकांमध्ये धनंजय यांनी राष्ट्रवादीला यश मिळवून दिलं होतं.
धनंजय मुंडे यांची राजकीय क्षमता ओळखून 2014 साली शरद पवारांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पंकजा मुंडे यांच्या विरोधातील चिक्की घोटाळा प्रकरण त्यांनी लावून धरलं होतं. त्या काळात केलेल्या संघर्षामुळे धनंजय हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीचे नेते बनले.
( नक्की वाचा : पंकजा मुंडेंनी सांगितली बाबांच्या नवसाची कहाणी, स्वत:ही केला भर सभेत नवस! )
धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला आणखी एक वळण 2019 साली मिळालं.त्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते पंकजा मुंडे यांचा पराभव करुन परळीचे आमदार बनले. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्याच्या राजकारणात एक भूकंप झाला होता. 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे अनेक आमदार त्या शपथविधीच्या दरम्यान अजित पवारांच्यासोबत होते.
अजित पवारांच्या या बंडाचं प्लॅनिंग धनंजय मुंडे यांनी केल्याचे आरोप त्यावेळी झाले. शपथविधीला जाणाऱ्या आमदारांचं एकत्रिकरण देखील धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी झालं होतं. पुढे फडणवीस-अजित पवारांचं सरकार औट घटकेचं ठरलं. त्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे देखील मंत्री झाले.
( नक्की वाचा : भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं )
महायुतीमध्ये प्रवेश आणि पुन्हा मंत्री
अजित पवारांनी 2019 साली फसलेल्या बंडाचा प्रयोग 2023 मध्ये यशस्वी केला. या प्रयोगातही त्यांना धनंजय मुंडे यांची भक्कम साथ होती. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत नेण्यात त्यांची भूमिका मोठी होती. निवडणूक प्रचारसभेत शरद पवारांनीही तशी टीका केली आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये अजित पवारांचे सर्वात विश्वासू नेते अशी धनंजय मुंडे यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे कृषी मंत्री होते. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वैर देखील आता संपुष्टात आलं आहे. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव धनंजय मुंडेंसाठीही धक्का होता. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी शरद पवारांनी त्यांची शक्ती पणाला लावली होती. त्यानंतरही धनंजय मुंडे यांनी तब्बल दीड लाख मतांनी परळी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.