मंगेश जोशी
विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांची अखेर मंत्रीपदी वर्णी लागली. त्यानंतर छगन भुजबळांचं एक वक्तव्य राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपली मंत्रीपदी वर्णी लागल्याचं विधान छगन भुजबळ यांनी केलं होतं. मात्र भुजबळांच्या मंत्रीपदामुळे नाशिकमध्ये पालकमंत्री पदाचा तिढाही वाढला आहे. दुसरीकडे छगन भुजबळांकडून पालकमंत्री पदासाठी दावा केला जाऊ शकतो अशी देखील शक्यता आहे. पालकमंत्री पदासाठी दावा करणे वाईट नसून मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर छगन भुजबळ हे तिसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात असं उपहासात्मक वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले असेल, तरी छगन भुजबळ पहिले ही उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे पक्षाने जबाबदारी टाकली तर कोणीही माणूस काही होऊ शकतो असं सुचक विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं आहे. गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांनी छगन भुजबळांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
मात्र अजित पवार हे उपमुख्यमंत्री असल्याने एकाच पक्षातील दोन उपमुख्यमंत्री सहसा अशक्य आहे. आपला समावेश मंत्रिमंडळात व्हावा यासाठी भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला होता. आता देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला मंत्री पद मिळाल्याचे छगन भुजबळ जाहीर पणे सांगत आहेत.फडणवीस व भुजबळांची ही जवळीक नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांसाठी मात्र डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.