एकनाथ खडसे स्वगृही परतणार हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजप प्रवेशाबाबत खडसे यांनी जाहीर पणे वक्तव्य केलं आहे. मात्र खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेमुळे सस्पेन्स वाढला आहे. त्यामुळे खडसेंची घरवापसी होणार की नाही याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. खडसे यांनी भाजप सोडताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली होती. भाजपला रामराम करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीसांनी मोजक्याच शब्दात उत्तर दिलं आहेत. खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, यावर बोलताना फडणवीस यांनी याबाबत आपल्याला अधिकृतरीत्या काहीही माहिती नाही. किंवा आपल्याला तसं काही कळवण्यात आलेलं नाही असं सांगितलं. जेव्हा अधिकृत पणे आम्हाला केंद्रीय नेतृत्वाकडून कळवण्यात येईल तेव्हा आम्ही त्याचं जरूर स्वागत करू अशी प्रतिक्रीया फडणवीस यांनी दिली आहे. भाजपमध्ये मोदींवर विश्वास ठेवून जो कोणी प्रेवश करत असेल, त्याला विरोध करण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले. त्यामुळे खडसेंच्या प्रवेशाबाबत अजूनही अधिकृतपणे फडणवीसांना कळवण्यात आलेलं नाही हे स्पष्ट होत आहे.
एकनाथ खडसेंची भूमिका काय?
एकनाथ खडसे यांनी आपण भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबत दिल्लीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या बरोबर चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. दिल्लीत केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पक्षात काही समज गैरसमज होते ते आता दुर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे आभार मानले आहेत. अडचणीच्या काळात पवारांनी साथी दिली असंही ते म्हणाले. दरम्यान पुढच्या 10 ते 15 दिवसात पक्षप्रेवश होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
खडसेंच्या प्रवेशाला कोणाचा विरोध?
खडसेंनी भाजप सोडताना देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांच्यावर जोरदार टिकेची झोड उठवली होती. राष्ट्रवादीमध्ये असताना गिरीष महाजन यांच्यावर त्यांनी टोकाची टिका केली होती. एकही दिवस असा जात नव्हता, ज्यात या दोघांमध्ये वादयुद्ध रंगत नव्हतं. शिवाय भाजप बरोबर आता शिंदेंची शिवसेना आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत पाटील हे सध्या मुक्ताईनगरचे आमदार आहे. त्यांनी एकनाथ खडसे यांची कन्या रोहीणी खडसेंचा पराभव केला होता. त्यामुळे खडसे भाजपमध्ये येणार असतील तर मुक्ताईनगर शिवसेनेकडे राहील याची हमी घ्या अशी आधीच मागणी त्यांनी केली आहे. या सर्व गोष्टीवरही भाजप नेतृत्वाला तोडगा काढावा लागणार आहे.