माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चार अॅफेडेव्हिटवर स्वाक्षरी करण्यास सांगितलं होतं, त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला म्हणून त्यांना 13 महिने तुरुंगात राहावं लागलं, असा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी केला होता. श्याम मानव यांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले फडणवीस?
'महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खोट्या केसेस टाकणे ही मोडस आॅपरेंडी होती. सीबीआयनं चार्जशीट दाखल केलीय, त्यात कशाप्रकारे गिरीश महाजनांवर मोक्का लागला पाहिजे यासाठी दबाव टाकला, याचा उल्लेख आहे. श्याम मानव मला आधीपासून ओळखतात. त्यांनी आरोप करण्यााधी मला विचारायला हवं होतं. काही सुपारीबाज इकोसिस्टिममध्ये घुसलेत. श्याम मानव त्यांच्या हाती लागले का?' असा सवाल फडणवीस यांनी विचारला.
फडणवीस पुढं म्हणाले की, ' मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी एफआयआर करायला लावला. हे (अनिल देशमुख) हे बेलवर बाहेर आहेत, सुटलेले नाहीत. एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, ते आरोप करत आहेत तरी मी शांत आहे. मी कोणाच्या नादी लागत नाही, लागलं तर सोडत नाही. त्यांच्याच पक्षातील लोकांनी मला काही ऑडिओ व्हिज्युअल आणून दिले आहेत. फडणवीस पुराव्याशिवाय कधीही बोलत नाही. फेक नॅरेटिव्ह करत असाल तर मला उघड करावं लागेल.'
( नक्की वाचा : BJP-RSS मध्ये अजित पवारांवर खलबतं, बंद बैठकीत नेमकं काय झालं? Inside Story )
जरांगेंच्या आरोपांना उत्तर
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पुणे सत्र न्यायालयानं यांच्यावर आजमीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. या प्रकरणात जरांगे यांनी फडणवीसांवर आरोप केले होते. उपमुख्यमंत्र्यांनी या आरोपांनाही उत्तर दिलं आहे.
'मनोज जरांगेंची केस 2013 ची आहे. यापूर्वी नाॅन बेलेबल वाॅरंट निघाला त्यांनी तो कॅन्सल केला. आधीही नाॅन बेलेबल वाॅरंट निघालं त्यांनी ते कॅन्सल केलं. ते हजर राहिले नंतर रद्द झाला, आता पुन्हा तारखेवर गेले नाहीत पुन्हा वाॅरंट निघालं आहे. या प्रकरणाचा आमचा काहीही संबंध नाही,' असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : BJP vs NCP वाद चिघळला! अमोल मिटकरींनी केली भाजपाच्या बड्या मंत्र्यांची तक्रार )
मनोज जरांगे यांचा उपोषणात संताप झाल्यानं ते रागात बोलले असं समजू या. देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्यानं कुणाला फायदा आहे? फडणवीसांमुळे कुणाला धोका आहे? हा प्रश्न मी तुम्हाला विचारेल. त्यानंतर इको सिस्टिम कोण चालवतोय हे तुम्हाला कळेल,' असं फडणवीस यांनी सांगितलं.