विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पण अजून ही सत्ता स्थापन झालेली नाही. सत्ता वाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. मुख्यमंत्री कोण असावा याचा निर्णय भाजप श्रेष्ठींनी घ्यावा असं सांगत एकनाथ शिंदे यांनी निर्णयाचा चेंडू दिल्लीच्या कोर्टात टाकला आहे. शिवाय ते नाराज असल्याचं ही बोललं जात आहे. तर दुसरीकडे भाजपनेही मुख्यमंत्री कोण हे अजूनही स्पष्ट केलेलं नाही. अशा वेळी शिवसेनेला एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहीजेत असं वाटत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याबाबतची पोस्टरही झळकत आहेत. त्या पैकीच एक पोस्टर अंबरनाथमध्ये लागले असून ते सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करत अंबरनाथमध्ये शिवसैनिकांनी बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सवर "भाई, आपल्याच रूपात हवाय आम्हाला कॉमन मॅन!", असं लिहिण्यात आलं असून शिवसेनेचे विभाग प्रमुख चंद्रकांत भोईर यांनी हे बॅनर्स लावले आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या सर्वाधिक जागा आल्यामुळे भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, अशी शक्यता व्यक्त होतेय.
ट्रेंडिंग बातमी - 'मुंबई मारवाड्यांची,मुंबई भाजपची' मारवाड्याचा माज मनसेनं उतरवला
दुसरीकडे मागील 2 ते 3 दिवसात घडलेल्या घडामोडी पाहता शिंदे नाराज असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसैनिकांची इच्छा असून त्यामुळेच आता अंबरनाथ शहरात हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार असून मुख्यमंत्री कोण होणार? हे अजूनही ठरलेलं नाही. त्यामुळे शिवसैनिक अजूनही शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, याबाबत आशावादी असल्याचं पाहायला मिळतंय.
ट्रेंडिंग बातमी - सफाई कामगार झाली उपमहापौर, आता रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ, कारण ऐकून हैराण व्हाल
अंबरनाथमध्ये लागलेला बॅनर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यावर लिहीलेला मजकूरही तितकाच बोलका आहे. भाई, लहानांसाठी शिंदे काका, बहिणींसाठी लाडका भाऊ, तरूणांसाठी लाडका दादा,जेष्ठांसाठी हक्काचा आधार, आपल्याच स्वरूपात हवाय आम्हाला कॉमन मॅन (CM) असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. शहराच्या मुख्य चौकात हा बॅनर झळकला असून तो सर्वांचे लक्ष वेधत आहे. अंबरनाथ हा मतदार संघ श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघात येतो.