विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी महापालिका, नगर परिषदा, जिल्हापरिषदा, नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. बीड, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, नाशिक आणि जालना या पाच जिल्ह्यातील विविध पक्षांचे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज मुंबईत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. अडीच वर्षात महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम, लोकाभिमुख योजनांमुळे भरघोस बहुमताने राज्यात महायुतीचे सरकार आले असंही ते यावेळी म्हणाले.
नक्की वाचा - मुस्लीम देश, मुस्लिम शहर, मुस्लिम जनता अन् रामायणाचा प्रयोग, देशाचं नाव ऐकून बसेल धक्का
आज बीड जिल्ह्यातील ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष अनंत चिंचाळकर, वशिष्ठ सातपुते, रामदास ढगे, संदीप माने, शिवाजी सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शाखाप्रमुखांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतला. तसेच छत्रपती संभाजी नगरमधील डॉ. जे. के जाधव, बाबा उगले, डॉ. परमेश्वर गुट्टे, मंगेश जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पंढरपूरमधील राम भिंगारे, श्रीनिवास उपळकर, औदुंबर गंगेकर, प्रशांत कोकरे तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला येथील रामकृष्ण खोकले, सुनिता जाधव, गणेश कदम, कल्पना ठोंबरे या सरपंचांसह पाच उपसरपंचांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. जालना जिल्ह्यातील सरपंच योगिता मुळे आणि उपसरपंच शेख मुकर्रम शेख नुर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिंदे म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून शिवसेनेत विविध पक्षातील लोकांचा प्रवेशाचा ओघ सुरु आहे. राज्यातील लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडके शेतकरी यांच्यासह सर्वच घटकांना मागील अडीच वर्षांत न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे शिवसेनेकडे लोकांचा ओघ वाढला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, यात महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.