प्रतिनिधी, मनोज सातवी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचाराचा धडाका सुरू आहे. पालघर जिल्ह्यातही युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी प्रथमच युवा मेळावा घेतला.
मात्र या मेळाव्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या जनतेची माफी मागावी असे म्हणत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी असताना साधू हत्याकांडा दरम्यान साधूंना न्याय देण्यासाठी त्यांनी अधिकारांचा वापर केला नाही. साधू हत्याकांडा दरम्यान ते कधी पालघरमध्ये आले नाही, मात्र आज मतं मागण्यासाठी पालघरला आले, अशी टीका त्यांनी केली. तसेच यावेळी त्यांनी मृत साधूंचे स्मारक पालघरमध्ये बांधण्याची विनंती आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचेही पूर्वेश सरनाईक यावेळी म्हणाले.
पालघर लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असला तरी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. पालघर लोकसभेत शिवसेनेचे राजेंद्र गावित खासदार आहेत. खासदार असताना ही अजून नाव जाहीर केलेले नाही. मात्र त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. पालघर जिल्ह्यातही युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आज प्रथमच युवा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा पहिला मेळावा 6 एप्रिल रोजी नालासोपाऱ्यात पार पडला.