भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची लवकरच मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांना तेलंगणा सरकार मंत्रिमंडळात स्थान दिले जावू शकते. तेलंगणा सरकारने अझरुद्दीन यांना विधान परिषदेच्या (MLC) निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तेलंगणा सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि प्राध्यापक कोडंडाराम रेड्डी यांना विधान परिषदेसाठी (MLC) उमेदवारी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयानंतर क्रीडा जगतात आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, अझरुद्दीन यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आहेत.
मोहम्मद अझरुद्दीन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एक पोस्ट लिहून आभार व्यक्त केले आहेत. त्यांनी लिहिले, "तेलंगणामध्ये राज्यपाल कोट्यातून एमएलसी पदासाठी मला नामनिर्देशित करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाने मला खूप आनंद झाला आहे. मला हा जो सन्मान दिला आहे त्या आपण भारावून गेलो आहोत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांचे त्यांच्या विश्वासासाठी आणि आशीर्वादासाठी मनःपूर्वक आभार." असं अझरुद्दीन यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी, उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क मल्लू आणि मंत्रिमंडळ, टीपीसीसी अध्यक्ष महेश गौड आणि तेलंगणा प्रभारी मीनाक्षी नटराजन यांच्या मार्गदर्शनासाठी आणि समर्थनासाठी मी त्यांचा आभारी आहे. मी प्रामाणिकपणे आणि पूर्ण समर्पणाने माझ्या राज्याची सेवा करण्यासाठी वचनबद्ध आहे. असे ही ते म्हणाले. "तेलंगणा मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. अझरुद्दीन यांना मंत्रीपद दिले जाईल असे मानले जात आहे. सध्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह 14 मंत्री आहेत. तीन जागा रिक्त आहेत. या आधी, तेलंगणातील जुबिली हिल्स मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. मात्र, राजकीय समीकरणांचा विचार करून पक्षाने त्यांना आता विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
अझरुद्दीन 2009 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून लोकसभेचे खासदार बनले होते. 2014 मध्ये त्यांना राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूरमधून तिकीट मिळाले, पण ते पराभूत झाले. 2018 मध्ये त्यांना तेलंगणा काँग्रेसचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले. 2023 मध्ये त्यांना जुबिली हिल्स येथून विधानसभेचे तिकीट मिळाले होते, पण ते निवडणूक हरले. बीआरएस नेते मागांती गोपीनाथ यांनी त्यांना निवडणुकीत हरवले होते. नंतर, आमदार मागांती गोपीनाथ यांच्या निधनानंतर जुबिली हिल्सची जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा लढण्याची इच्छा अझरुद्दीन यांनी व्यक्त केली होती. पण त्या आधीच त्यांना विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली आहे.