
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायलय 2 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आपला फैसला सुनावणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीपूर्वी हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. दक्षिण मुंबईतील विविध भागांमध्ये मराठा समाजाचे आंदोलक जात असून त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. या आंदोलकांमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांनीही या आंदोलकांमुळे होत असलेल्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे उच्च न्यायालयाने दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नक्की वाचा: महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन, राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल
कोर्टात काय घडले ?
मुंबई उच्च न्यायलयाने सोमवारी (1 सप्टेंबर) झालेल्या सुनावणीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांना चांगलेच सुनावले. ज्या अटी शर्ती घालून दिल्या होत्या, त्यांचे पालन होत नसल्याबद्दल कोर्टाने नाराजी व्यक्त केली. आंदोलकांना वानखेडे किंवा ब्रेबॉन स्टेडियम देण्यात यावे अशी मागणी केली होती. यावर बोलताना न्यायालयाने म्हटले की ही दोन्ही मैदाने ही आयकॉनिक स्टेडियम आहेत. न्यायालयाने म्हटले की, "आज आंदोलक रस्त्यावर कबड्डी खेळतायत, उद्या रस्त्यावर क्रिकेट खेळायला सुरूवात कराल."
आजच्या सुनावणीत मुंबई हायकोर्टाने मराठा आंदोलकाना काही सवाल विचारले आहेत. तुमचे तंबू आझाद मैदानात असताना तुम्ही रेल्वे स्टेशनमध्ये का जात आहात? तुमची चिखलात बसण्याची तयारी आहे का? अटी आणि शर्तींचे उल्लंघन का केलं गेलं? इतरत्र तुम्ही का फिरत आहात. त्याचा त्रास मुंबईकरांना होत नाही का? असे प्रश्न कोर्टाने उपस्थित केले आहे. पाच हजार आंदोलकांनाच परवानगी होती, मग जास्त आंदोलक कसे आले असं ही कोर्टाने विचारले आहे. मुंबईकरांना या आंदोलनाचा त्रास होता कामा नये असं ही कोर्टाने म्हटलं आहे. आम्ही संयम ठेवून आहोत कारण काही तरी चांगलं होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे असं ही कोर्टाने सुनावणी दरम्यान म्हटलं आहे.
जरांगेंना नोटीस बजावलं का असे ही कोर्टाने विचारलं आहे. तर मराठा आंदोलकांमार्फत रस्ता रोको केला गेला असं सदावर्ते यांनी कोर्टात सांगितलं. तर मुंबईकरांच्या गाड्या अडवल्या जात आहेत, ट्राफीक जाम केलं जात आहे असंही सरकारतर्फे कोर्टात सांगितलं गेलं. यावर सरकार गप्प का बसले आहे असा प्रश्न कोर्टाने केला. कोर्टाने निर्णय द्यावा आम्ही लगेच कारवाई करू असं सरकारने कोर्टात सांगितलं आहे. शिवाय बाहेरून लोकांना बोलवू असं धमकावलं जात असल्याचं ही सरकारने कोर्टात सांगितलं आहे. दरम्यान अत्यावश्यक सेवा आणि माल वाहतूकीत कोणतीही अडचण येवू नये असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडीत होवू देवू नका. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्रास होता कामा नये असे कोर्टाने मराठा आंदोलकांना बजावले आहे.
जरांगेंना आंदोलनाला वाढीव परवानगी दिलेली नाही. शहराला खेळाचे मैदान केले आहे. पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडले जात आहेत. त्यांची खेळणी बनवली जात आहे अशी माहिती सरकार तर्फे कोर्टात देण्यात आली. सरकारने चर्चा सुरू ठेवली आहे. तर दुसरीकडे हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचं सरकारने कोर्टात सांगितलं आहे. आंदोलनावर तोडगा कसा काढणार असा प्रश्न कोर्टाने विचारला. त्यावर कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं सरकारनं सांगितलं आहे. शिवाय कोर्टाने कारवाईचा आदेश द्यावा अशी मागणी सरकारने कोर्टाकडे केली आहे. तर वानखेडे आणि ब्रेबॉन स्टेडिअम आंदोलनासाठी द्यावं अशी मागणी मराठा आंदोलकांना कोर्टात केली आहे. तर तुम्ही काय मागणी करताय हे तुम्हाला समजतं का असा प्रतिप्रश्न कोर्टाने स्टेडिअम मागणीवर केला आहे.
पाच हजार आंदोलकांना परवानगी दिली होती. अन्य आंदोलकांनी आता परत जावं असं कोर्टानं मत मांडलं आहे. मनोज जरांगे यांना अटी आणि शर्तीत राहून आंदोलन करावं लागेल. शिवाय मुंबईच्या बाहेरून जे येत आहेत त्यांना बाहेरच थांबवे असे आदेश कोर्टाने दिले आहेत. मुंबईकरांना त्याचा त्रास होत आहे असं कोर्टाने म्हटलं आहे. शिवाय सिग्नलवर मराठा आंदोलक नाचत असल्याचा व्हिडीओ ही कोर्टात दाखवला गेला. त्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान कोर्टाने आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात सरकार मार्फत केली आहे. सरकारकडून कोर्टाला आवाहन करण्यात आले आहे.
कोर्टाने आदेश द्यावेत अशी मागणी ही केली आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयावर आता मराठा आंदोलनाचे भवितव्य ठरणार आहे. तर आंदोलक नाही तर जेवणाच्या गाड्या तरी मुंबईत सोडा. आमचं जेवण अडवू नका अशी मागणी मराठा आंदोलकांनी कोर्टात केली आहे. मात्र मराठा आंदोलक गाडीमधून दारू आणत आहेत असा आरोप गणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात केला आहे. त्यामुळे पोलिसांना त्रास होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता कारवाई करावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात केली आहे. दरम्यान मुंबई हायकोर्टातली आजची सुनावणी इथेच संपली आहे. कोणतेही आदेश कोर्टाने दिले नाही. त्यामुळे यावर आता उद्या सुनावणी होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world