Gujarat Cabinet Reshuffle: महाराष्ट्राच्या शेजारच्या गुजरातमधून मोठी राजकीय बातमी आहे. गुजरातचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सुपूर्द केले असून, ते त्यांनी स्वीकारले आहेत. यानंतर आता नवीन मंत्रिमंडळाच्या (Cabinet) स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नव्या मंत्रिमंडळाचा कधी शपथविधी?
नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या (शुक्रवार 17 ऑक्टोबर) मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आज रात्री राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन नवीन सरकार स्थापनेचा दावा सादर करणार आहेत. यानुसार, शुक्रवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 11:30 वाजता गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल.
( नक्की वाचा : Jai Shree Ram: 'जय श्रीराम, जय श्रीराम...आणखी काय? मुस्लीम पोलीस अधिकाऱ्याला का द्यावी लागली घोषणा? पाहा Video )
काय आहे कारण?
भाजपने नुकतीच जगदीश विश्वकर्मा यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे, ज्यामुळे मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहरे समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. सध्या गुजरातमध्ये 16 मंत्री आहेत, तर राज्यात जास्तीत जास्त 27 मंत्री बनवता येतात. त्यामुळे मंत्रिमंडळात नवीन सदस्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी कॅबिनेट विस्तारात जवळपास 10 मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. तर विद्यमान मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांना वगळले जाऊ शकते.
भाजपा अध्यक्ष करणार देखरेख
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुजरात मंत्रिमंडळातील बदलांची देखरेख भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा करणार आहेत. ते गुरुवारी संध्याकाळी गुजरातमध्ये दाखल होतील. कॅबिनेट विस्तारासंदर्भात त्यांची मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, माजी प्रदेश भाजप अध्यक्ष सी.आर. पाटील आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांसोबत अनेक बैठका होणार आहेत. पक्षाच्या सूत्रांनुसार, बैठकांमध्ये चर्चा गुजरात मंत्रिमंडळातील फेरबदल आणि राज्यातील इतर प्रमुख संघटनात्मक बाबींवर केंद्रित राहण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीच्या काही दिवसांनंतर नड्डा यांचा हा दौरा होत आहे. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्य मंत्रिमंडळात होणाऱ्या बदलांवर चर्चा केली होती.