Haryana Election Results 2024 : मंगळवारी (8 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता हरियाणातील मतमोजणी सुरु होऊन एक तास झाल्यानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात जल्लोष सुरु होता. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात जिलेबी वाटली जात होती. ढोल वाजवून कार्यकर्ते विजयाचा आनंद साजरा करत होते. तर भाजपाच्या मुख्यालयात शांतता होती.
पण, तासाभरानंतरच चित्र बदललं. भाजपानं शर्यतीमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर दोन तासांनी भाजपानं काँग्रेसवर आघाडी घेतली. काही वेळांनी सर्व एग्झिट पोलचे अंदाज चुकवत भाजपानं हरियाणामध्ये आजवरचा सर्वात मोठा विजय मिळणार अशी शक्यता निर्माण झाली. अनेक मतदारसंघात चुरशीची लढत सुरु होती. त्यामुळे हे चित्र बदललेल असा काँग्रेसला विश्वास होता. पण, काँग्रेसचं मनोरथ पूर्ण झालं नाही.
हरियाणामधील काँग्रेसच्या धक्कादायक पराभवाची 5 महत्त्वाची कारणं आहेत.
अंतर्गत मतभेद : हरियाणामध्ये 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेला 31 जागा मिळाल्या होत्या. सध्याचे ट्रेंड पाहता राज्यात जबरदस्त मुसंडी मारण्याचं पक्षाचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे.पक्षांतर्गत मतभेद हा काँग्रेसच्या पिछेहाटीमधील एक महत्त्वाचा घटक ठरला आहे.
विधानसभा निवडणुकीच्यापूर्वीच काँग्रेस नेत्यांनी विजय गृहित धरला होता. राज्यातील नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरु केलं होतं. भूपिंदर सिंह हुड्डा आणि कुमारी शैलजा या दोन ज्येष्ठ नेत्यांमधील मतभेदांनी टोक गाठलं होतं. या मतभेदांमुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं. भूपिंदर सिंह हुड्डा यांना तिकीट वाटपामध्ये झुकतं माप देण्यात आलं होतं. त्याचा पक्षाला फारसा फायदा झालेला दिसत नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्थानिक पक्ष आणि अपक्षांचा फटका : काँग्रेसनं मतांच्या टक्केवारीमध्ये भाजपावर निसटती आघाडी घेतली आहे. पण ट्रेंडिंगनुसार मतांच्या टक्केवारीचं विजयी जागांमध्ये रुपांतर करण्यात पक्षाला अपयश आलं. अनेक मतदारसंघात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांच्या मतांमध्ये अगदी कमी अंतर आहे. त्या मतदारसंघातील स्थानिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मिळवलेल्या मतांचा फटका काँग्रेसला बसला.
जाटविरोधी मतांचं ध्रुवीकरण : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचं नेतृत्त्व भूपिंदर सिंह हुड्डा यांच्याकडं होतं. हुड्डा यांनी जाट मतांवर प्रामुख्यानं फोकस केला होता. त्यामुळे जाटसोडून अन्य जातींच्या मतदारांचं काँग्रेसविरोधात ध्रुवीकरण झाले. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान NDTV ला 'जाटशाही' हा शब्द सातत्यानं ऐकायला मिळाला. काँग्रेसला सत्ता मिळाली तर हरयाणातील प्रबळ जातीचं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित होईल, अशी अन्य मतदारांची समजूत झाली. त्यामुळे अन्य पक्षांनी मोठ्या प्रमाणात सत्तारुढ भाजपाला मतदान केलं.
( नक्की वाचा : हरियाणात भाजपाच्या विजयातील सर्वात मोठा फॅक्टर कोणता? एका गोष्टीमुळे बदललं चित्र )
भाजपाचे होमवर्क : जवळपास सर्नच राजकीय विश्लेषकांनी हरियाणामध्ये भाजपाची सत्ता जाणार असं भाकित केलं होतं. पण, मतदारसंघात शांतपणे केलेल्या कामांच्या जोरावर सत्तारुढ पक्षानं पुन्हा एकदा बाजी मारली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांच्यावर भाजपानं निवडणूक प्रचाराची जबाबदारी सोपवली होती. प्रधान यांनी पक्षाला निराश केलं नाही. काँग्रेसच्या तोंडातून पुन्हा एकदा विजयाचा घास हिसकावून घेण्यात यश आलं. लोकांच्या पाठिंब्याचं मतांमध्ये रुपांतर करण्यात अपयश का आलं? याचं काँग्रेसनं आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, अशी कबुली काँग्रेसचे प्रवक्ते अजॉय कुमार यांनी NDTV शी बोलताना व्यक्त केली.
भाजपाचं शहरी भागात वर्चस्व : गेल्या दशकभरात भाजपानं हरियाणातील शहरी भागावर वर्चस्व मिळवलं आहे. ते वर्चस्व यंदाही कायम आहे. हरियाणातील ग्रामीण भागात दमदार कामगिरीची काँग्रेसला अपेक्षा होती. पण, अपेक्षित यश मिळवण्यात काँग्रेसला अपयश आलं.