Haryana Elections Results 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीत जाट आणि जिलबी हे दोन प्रचलित शब्द होते. संपूर्ण निवडणूक प्रचारात काँग्रेसची या दोन फॅक्टरवर मोठी भिस्त होती. पण, काँग्रेसची रणनिती यशस्वी ठरली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रचारसभेत हरियणामधील प्रसिद्ध गोहाना जिलबीचा उल्लेख केला होता. जिलबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करुन त्याची निर्यात करण्यात येईल, अशी घोषणाच राहुल गांधी यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याची भाजपानं जोरदार थट्टा केली.
मंगळवारी (8 ऑक्टोबर) सकाळी सुरुवातीला काँग्रेसला हरियाणामध्ये आघाडी मिळाली होती. त्यावेळी पक्ष कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात जिलबीचं वाटप सुरु केलं होतं. पण, त्यांचा आनंद क्षणभंगुर ठरला. मतमोजणीच्या पुढच्या टप्प्याचत भाजपानं आघाडी घेतली. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन सुरु केलं. भाजपा कार्यकर्त्यांनी जिलबीची मोठी ऑर्डर देऊन सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. भाजपा कार्यकर्त्यांनी तोंड गोड करण्यासाठी जिलबीची निवड करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांना थेट राजकीय संदेश दिला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे जिलबी पुराण?
हरियाणा विधानसभा निवडणुकीत जिलबीचं पुराण गोहानापासून सुरु झाले. राहुल गांधी यांनी गोहानामधील सभेत गोहानामधील प्रसिद्ध मातू राम हलवाई यांचा उल्लेख केला. त्यांच्या जिलेबीची देशभरात विक्री झाली पाहिजे इतकंच नाही तर त्याची परदेशातही निर्यात होणं आवश्यक आहे, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. त्यामधून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असा दावा गांधी यांनी केला होता.
'मातू राम यांची जिलबीची अन्य राज्यांमध्ये निर्यात झाली तर ऐकेदिवशी येथील कारखान्यात 20 ते 50 हजार कामगार काम करतील,' असा दावा गांधी यांनी केला. मातू राम सारख्या व्यापाऱ्यांना केंद्र सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटी धोरणांचा फटका बसला असं राहुल गांधी यांनी त्यावेळी बोलताना सांगितलं होतं.
( नक्की वाचा : हरियाणातील काँग्रेसच्या धक्कादायक पराभवाची 5 प्रमुख कारणं कोणती? )
भाजपाकडून उत्तर
राहुल गांधी यांच्या वक्तव्याची भाजपाकडून जोरदा खिल्ली उडवण्यात आली होती. जिलबी कशी तयार होते हेच राहुल गांधी यांना माहिती नाही, असा टोला ज्येष्ठ भाजपा नेते रवी शंकर प्रसाद यांनी लगावला होता. 'मला देखील गोहानाची जिलबी आवडते. आता राहुल गांधी जिलबीचा कारखाना अमेरिकेत सुरु करणार असं म्हणत आहेत. पण, त्यांना जिलबी कशी तयार होते आणि त्याची विक्री कशी होते हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यांना भाषण लिहून देणाऱ्यांनी योग्य माहिती दिली असती तर बरं झालं असतं. राहुल गांधी यांनी त्यांचा होमवर्क नीट केलेला नाही,' असा टोला प्रसाद यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या दरम्यानही गोहानामधील जिलबीचा उल्लेख केला होता. 'विरोधकांच्या इंडी आघाडीकडं पाच वर्षांसाठी पाच पंतप्रधान करण्याचा फॉर्म्युला आहे. ही पंतप्रधानांची खुर्ची आहे की मातू राम यांची जिलेबी हे त्यांना विचारा?', असा सवाल मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केला होता.
( नक्की वाचा : हरियाणात भाजपाच्या विजयातील सर्वात मोठा फॅक्टर कोणता? एका गोष्टीमुळे बदललं चित्र )
काय आहे गोहाना जिलबीचा इतिहास?
हरियणा विधानसभा निवडणुकीत चर्चेत आलेली गोहाना जिलबीची सुरुवात 1958 साली दिवगंत मातू राम यांनी केली. पीटीआयच्या रिपोर्टनुसार सध्या हा व्यवसाय त्यांचे नातू रमण गुप्ता आणि नीरज गुप्ता चालवत आहेत.
'ही जिलबी शुद्ध तुपात बनवली जाते. कुरकुरीत आणि मऊ असलेल्या एका जिलबीचं वजन 250 ग्रॅम आहे. चार जिलबीच्या एका बॉक्सची किंमत 320 रुपये आहे. हा जिलबीचा बॉक्स एक आठवड्यापेक्षा जास्त टिकतो,' अशी माहिती रमण गुप्ता यांनी पीटीआयला दिली.
गोहाना आणि जिलबीचं नातं सांगताना गुप्ता म्हणाले की, 'गोहाना हे धान्याचं मोठं मार्केट आहे. शेतकरी अगदी प्रतिकूल हवामानातही शेतामध्ये भरपूर कष्ट करतात. आमची शुद्ध तुपातील मोठी जिलबी त्यांना आवश्यक कॅलरी देते. त्याचबरोबर ती दीर्घकाळ टिकत असल्यानं त्यांना ती नंतर कधीही खाता येते.'
'सुरुवातीला हे लहान दुकान होते. पण, हळूहळू जिलबी प्रसिद्ध झाली. त्यानंतर गोहानाजवळून जाणारे प्रमुख राजकीय नेते देखील जिलबीचा आस्वाद घेण्यासाठी इथं आवर्जून येतात,' असं त्यांनी सांगितलं.