Nitish Kumar : नितीश कुमारांचे राजकीय वारसदार समजले जाणारे मनिष वर्मा कोण आहेत?

Who is Nitish Kumar Successor : सध्या 73 वर्षांचे असलेल्या नितीश कुमार यांचा राजकीय वारसदार कोण? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही त्यांची तब्येत नीट नसल्याची चर्चा जोरात होती.

Advertisement
Read Time: 3 mins
N
मुंबई:

Who is Nitish Kumar Successor : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भारतीय राजकारणातील दिग्गज नेते आहेत. गेल्या 19 वर्षांमध्ये 9 महिन्यांचा छोटा कालावधी सोडला तर ते सातत्यानं बिहारचे मुख्यमंत्री आहेत. नितीश यांनी गेल्या 11 वर्षात 4 वेळा बाजू बदलली आहे. भाजपा-राष्ट्रीय जनता दल (राजद)-भाजपा-राजद आणि पुन्हा भाजपा असा त्यांचा प्रवास आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी INDIA आघाडीची साथ सोडून NDA मध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत अनेकांचा अंदाज चुकवत नितीश कुमार यांनी लक्षणीय यश मिळवलं. त्यांच्या जनता दल युनायटेडनं 12 जागा जिंकल्या. लोकसभेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं नितीश कुमार यांचं महत्त्व वाढलंय. मोदी 3.0 मध्ये त्यांची मोठी भूमिका असणार आहे.

नितीश कुमार यांनी त्यांचे बिहारमधील विरोधक लालू प्रसाद यादव यांच्या घराणेशाहीवर सातत्यानं टीका केलीय. ही टीका करत असताना आपल्या कुटुंबातील व्यक्ती राजकारणात येणार नाही, याची खबरदारीही घेतली. सध्या 73 वर्षांचे असलेल्या नितीश कुमार यांचा राजकीय वारसदार कोण? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही त्यांची तब्येत नीट नसल्याची चर्चा जोरात होती.

Advertisement

( नक्की वाचा : बिहारमध्ये किंग ते देशात किंगमेकर, कशी पलटवली नितीशकुमारांनी बाजी? )
 

कोण होणार राजकीय वारसदार?

नितीश कुमार यांचा राजकीय वारसदार म्हणून सध्या एका व्यक्तीची बिहारमध्ये जोरदार चर्चा आहे. ही व्यक्ती गेल्या सहा वर्षांपासून नितीश कुमारांसोबत सावलीसारखी आहे. ही व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील किंवा पक्षातील नाही. तर माजी IAS अधिकारी आहे. मनिष वर्मा असं या नेत्याचं नाव असून त्यांनी नुकताच जेडीयूमध्ये प्रवेश केलाय. मनिष वर्मा पक्षात आरसीपी सिंह यांची जागा घेणार आहेत. विशेष म्हणजे आरसीपीप्रमाणे ते देखील कुर्मी जातीचे आहेत. 

Advertisement

ओडिशा केडरचे अधिकारी

मनिष वर्मा ओडिशा केडरचे 2000 च्या बॅचचे अधिकारी होते. त्यांनी 2018 साली स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतली. नितीश कुमार यांच्या सूचनेनंतरच त्यांनी हा निर्णय घेतला असं मानलं जातं. निवृत्तीनंतर ते नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयांमध्ये सामील झाले. त्यांना जेडीयूचे सरचिटणीस केले जाईल, अशी चर्चा आहे. ते गेल्या एक वर्षांपासू कोणत्याही पदाशिवाय संघटनात्मक कामात सक्रीय आहेत. 

Advertisement

वर्मा यांनी ओडिशामधील माओवादाचा प्रभाव असलेल्या मलकानगिरीसह तीन जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे. ते 2012 साली बिहारमध्ये आले. राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाचे  संचालक म्हणून त्यांना पहिलं पोस्टिंग मिळालं. त्यानंतर पटना आणि पूर्णिया या दोन जिल्ह्यांचे ते जिल्हाधिकारी होते. मनिष देखील नितीश कुमारांप्रमाणेच नालंदा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील अशोक वर्मा बिहारशरीफमधील प्रसिद्ध डॉक्टर होते. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

 महत्त्वाची भूमिका

मनिष वर्मा  कोणत्याही पदाशिवाय संघटनात्मक कामात सक्रीय भूमिका बजावत आहेत. जेडीयूच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही ते सक्रीय होते. त्यांनी जेडीयूनं लढवलेल्या सर्व 16 लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता. यापैकी 12 जागांवर पक्षाचा विजय झाला.  

काही दिवसांपूर्वी जेडीयूच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यसभा सदस्य संजय झा यांची पक्षाची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आता मनिष कुमार यांची सरचिटणीस (संघटना) नियुक्ती होणार अशी चर्चा आहे. 

जेडीयूमधील नोकरशाह

जेडीयूच्या सरचिटणीसपदी यापूर्वी माजी नोकरशाह आरसीपी सिंह होते. नितीश कुमारांशी मतभेद झाल्यानंतर त्यांना पदावरुन दूर करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. पक्ष सोडण्यापूर्वी आरसीपी सिंह जेडीयूमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. त्यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षही करण्यात आलं होतं. ते केंद्र सरकारमध्येही मंत्री होते. त्यानंतर नितीश कुमार यांच्याशी त्यांचे मतभेद झाले.

मनिष वर्मा जेडीयूमध्ये सहभागी झालेले सातवे नोकरशाह आहेत. यापूर्वी एनके सिंह, पवन वर्मा, आरसीपी सिंह, केपी रमैया, गुप्तेश्वर पांडेय आणि सुनील कुमार यांनी जेडीयूचं सदस्यत्व घेतलं होतं. यापैकी   एनके सिंह, पवन वर्मा आणि आरसीपी सिंह राज्यसभा सदस्य होते. माजी आयपीएस अधिकारी सुनील कुमार सध्या नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात आहेत. तर केपी रमैया आणि गुप्तेशवर पांडेय यांची राजकीय इनिंग फार काळ टिकली नाही.