जाहिरात

Nitish Kumar : बिहारमध्ये किंग ते देशात किंगमेकर, कशी पलटवली नितीशकुमारांनी बाजी?

Nitish Kumar : गेल्या 11 वर्षात 4 वेळा बाजू बदलण्याचे प्रयोग केल्यानंतही आपली उपयुक्तता संपली नसल्याचं नितीश कुमार यांनी दाखवून दिलंय.  

Nitish Kumar : बिहारमध्ये किंग ते देशात किंगमेकर, कशी पलटवली नितीशकुमारांनी बाजी?
नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीत 16 पैकी 12 जागा जिंकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
मुंबई:


लोकसभा निवडणुकीचे 2024 (Lok Sabha Elections 2024 Result)  निकाल बहुतेक एक्झिट पोलचे अंदाज चुकवणारे ठरले. मागील दोन निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला यंदा 240 जागा मिळाल्या आहेत. भाजपा लोकसभेतील बहुमतापेक्षा 32 जागा दूर आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच आघाडी सरकार चालवावं लागणार आहे. मोदींच्या नेतृत्त्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (NDA) नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेडनं 12 जागा जिंकल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडणारे नितीश कुमार यांच्यावर मोदी 3.0 मध्ये महत्त्वाची जबाबदारी आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'नितीश कुमार सबके है'

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागताच 'नितीश कुमार सबके है' या आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. नितीश कुमार यांच्या राजकीय कमबॅकपेक्षा ते या सरकारमध्ये किती टिकणार? यावर चर्चा सुरु झाल्या. स्वत: नितीश यांनी याबाबत सर्व प्रकारच्या शक्यता फेटाळल्या आहेत. पण, त्यानंतरही त्यांच्या भविष्यातील भूमिकेवर अनेक राजकीय विश्लेषकांना शंका आहेत. ही शंका असण्याचं मुख्य कारण त्यांच्या राजकीय वाटचालीत आहे.

समर्थकांमध्ये 'सुशासन बाबू' म्हणून ओळखले जाणारे नितीश कुमारांवर त्यांचे विरोधक 'पलटूराम' म्हणून टीका करतात. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये टिकून राहण्याची कला चांगलीच आत्मसात केलीय. त्यामुळेच गेल्या 19 वर्षांमध्ये जीतनराम मांझी यांचा 9 महिन्यांचा कालावधी सोडता नितीश कुमार सातत्यानं बिहारचे मुख्यमंत्री आहेत. हे मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी त्यांनी भाजपा, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, डावे पक्ष अशा भिन्न विचारसरणी असलेल्या पक्षांशी युती केलीय. गेल्या 11 वर्षात 4 वेळा बाजू बदलण्याचे प्रयोग केल्यानंतही आपली उपयुक्तता संपली नसल्याचं त्यांनी दाखवून दिलंय.  

( नक्की वाचा : Explainer नितीश कुमार, नायडूंना भाजपाकडून लोकसभा अध्यक्षपद आणि अर्थमंत्रालय का हवंय? )
 

राजकपूरचे फॅन, समाजवादी नेते ते भाजपाचे मित्र

बिहार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सध्याचं NIT पाटणा) मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअर झालेले नितीश कुमार हे राज कपूरचे जबरदस्त फॅन होते. स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा असलेल्या नितीश यांनी समाजवादी चळवळीत राजकारणाला सुरुवात केली. कर्पुरी ठाकूर, राममनोहर लोहीया, जयप्रकाश नारायण या दिग्गज नेत्यांच्या त्यांच्यावर सुरुवातीच्या काळात प्रभाव होता. त्यानंतर ते सुरुवातीला लालूप्रसाद यादव आणि नंतर जॉर्ज फर्नांडीस यांचे विश्वासू सहकारी बनले.

जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पक्षाची स्थापना केल्यानंतर त्या पक्षाची भाजपासोबत युती करण्यात नितीश यांचा मोठा वाटा होता. देशात आघाडी सरकारचा प्रयोग सुरु असताना 1996 साली भाजपा आणि समता पक्षाची युती झाली.  या युतीनं बिहारमधील 'लालूराज संपवण्यासाठी' एकत्र येत जोरदार संघर्ष केला. 2000 साली नितीश पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांची खुर्चा फक्त 7 दिवसच टिकली. पण,त्यांनी लालूराजला प्रबळ पर्याय दिला. पुढे 5 वर्षांनी लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाला (RJD) त्यांनी सत्तेतून हद्दपार केलं. तेव्हापासून आजवर एकदाही राष्ट्रीय जनता दलाला स्वबळावर बिहारमध्ये सत्ता मिळवता आलेली नाही. 

( नक्की वाचा : BJP स्पष्ट बहुमतापासून दूर, PM मोदींना करावा लागणार 5 मोठ्या आव्हानांचा सामना )
 

नितीश कुमारची उपयुक्तता काय?

नितीश कुमार 2005 साली पहिल्यांदा सत्तेत आले. त्यानंतर त्यांनी बिहारमधील 3 विधानसभा निवडणुका (2010, 2015, 2020) आणि चार लोकसभा निवडणुकांना (2009, 2014, 2019, 2024) ते सत्तेत राहून सामोरं गेले आहे. यामधील 2014 च्या मोदी लाटेतील लोकसभा निवडणूक वगळता प्रत्येक निवडणुकीत त्यांनी स्वत:चं स्थान टिकवलंय. बिहारसारख्या मोठ्या आणि राजकीय गुंतागुतीच्या राज्यात हे यश नक्कीच मोठं आहे.

बिहारमधील जंगलराजला सुशासन हा पर्याय देत नितीश कुमार पहिल्यांदा सत्तेवर आले. राज्यातील कायदा सूव्यवस्था सुधारण्यात त्यांना सुरुवातीला यश मिळालं. त्यामधूनच 'सुशासन बाबू' ही त्यांची ओळख निर्माण झाली. पण फक्त सुशासन बाबू ही त्यांची ओळख नाही. इलेक्ट्रिक इंजिनिअर असलेल्या नितीश कुमार यांनी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग बिहारमध्ये राबवला आणि यशस्वी केला.

बिहारमध्ये फक्त 4 टक्के असलेल्या कुर्मी जातीमधून नितीश कुमार येतात. त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्याच टर्ममध्ये दलितांमध्येही मागास असलेल्या जातींसाठी महादलित हा वर्ग बनवला. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या. त्याचबरोबर कधी सवर्णांची व्होटबँक सोबत असलेल्या भाजपाशी तर कधी  यादव-मुस्लीम मतांचे 'मसीहा' असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्याशी त्यांनी आघाडी करत निवडणुका जिंकल्या.

( नक्की वाचा : राहुल गांधींनी एक चूक केली नसती तर आज देशाचं चित्र वेगळं असतं )
 

2024 मध्ये काय झालं?

'मिट्टी में मिल जाऊंगा लेकिन भाजपा के साथ नहीं जाऊंगा' असं एकेकाळी जाहीर करणारे नितीश कुमार 2024 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांची छावणी सोडून भाजपाच्या पाठिंब्यानं बिहारचे मुख्यमंत्री झाले. भाजपाच्या गटात दाखल होण्यापूर्वी त्यांनी विरोधकांची इंडिया आघाडी तयार करण्यात पुढाकार घेतला होता. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यासारखे यापूर्वी युपीएमध्ये नसलेले पक्ष नितीश कुमार यांनी 'इंडिया' मध्ये आणले. 

पण, इंडिया आघाडीमध्ये आपल्याला पुरेसं महत्त्व मिळत नाही हे लक्षात येताच त्यांनी पुन्हा भाजपासोबत हातमिळवणी केली. लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकायच्या असतील तर भाजपासोबत गेलं पाहिजे हे गेली साडेचार दशकं राजकारणात सक्रीय असलेल्या नितीश कुमार यांनी ओळखलं. या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या 16 पैकी 12 जागा जिंकत त्यांनी हा अंदाज बरोबर असल्याचं दाखवून दिलं.

2020 च्या विधानसभा निवडणुकीत फक्त 43 जागा जिंकणाऱ्या नितीश कुमार यांचं राजकारण संपलं अशी चर्चा गेली चार वर्ष सुरु होती. निवडणूक प्रचारात त्यांच्या तब्येतीची, 'मोदींना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करा' असं आवाहन करणाऱ्या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतरही त्यांनी बिहारमध्ये भाजपाच्या बरोबरीनं यश मिळवलं. 

दारुबंदी, महिलांना सरकारी मदत देणारी जीविका योजना, सायकल योजना यासारख्या योजनांमधून नितीश कुमार यांनी महिला मतदारांची मतं आपल्याकडं खेचण्यात यश मिळवलं. त्याचबरोबर बिहारमधील 'जंगलराज' ची मतदारांना सातत्यानं आठवण करुन देत त्यांनी आरजेडीला बॅकफुटवर ढकललं.

( नक्की वाचा : महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत? )
 

पुढं काय होणार?

लोकसभा निकालानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये नितीश कुमार यांचं महत्त्व वाढलंय. त्यांच्या पक्षाला आणि राजकीय कारकिर्दीला संजीवनी मिळालीय. समान नागरी कायदा, NRC, CAA ते वन नेशन वन इलेक्शन पर्यंतच्या अनेक मुद्यांवर त्यांचे आणि भाजपाचे मतभेद आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला विरोध करत त्यांनी 11 वर्षांपूर्वी NDA ला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी दोन वेळा भाजपाबरोबर युती आणि विरोधक असा खेळ केला असला तरी आता ते हिंदुत्वावरही त्यांचे नव्या सरकारशी खटके उडू शकतात. 

पुढील वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आपल्या व्होट बँकेला टिकवून ठेवण्यासाठी खास योजना आणि बिहारला विशेष राज्याचा दर्जा या मागण्या देखील त्यांच्या अजेंड्यावर असणार आहेत. नितीश कुमार सुशासन बाबू आहेत की पलटूराम ? या प्रश्नावर दोन्ही गटांच्या समर्थकांचं मत नेहमीच एकसारखं नसतं. पण, दोन्ही गटामध्ये त्यांची उपयुक्तता नेहमीच कायम आहे.  बिहारमध्ये गेली दोन दशकं नेहमीच किंगच्या रोलमध्ये असलेल्या नितीश कुमार यांना आता केंद्रात किंगमेकरचा रोल मिळालाय. या नव्या भूमिकेत ते किती रमतात आणि किती टिकतात यावर देखील मोदी सरकार 3.0 च्या वाटचाल निश्चित होणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com