महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आटोपताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एक धक्का बसलाय. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. पक्षात काहीही व्यवस्थित सुरु नाही. सेल्फी घेऊन, सोशल मीडियावर पोस्ट टाकून पक्ष चालत नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर मी फक्त आणि फक्त सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याचं दुहान यांनी जाहीर केलंय. शरद पवारांच्या विश्वासू सहकारी म्हणून दुहान ओळखल्या जात होत्या. 'लेडी जेम्स बॉन्ड' अशी देखील त्यांची पक्षात प्रतिमा होती. दुहान यांनी थेट सुप्रिया सुळे यांचं नाव घेतल्याचे पडसाद आगामी काळात उमटणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुहान यांनी पक्ष सोडल्यानंतर वृत्तसंस्था ANI शी बोलताना सांगितलं की, 'मी शरद पवारांची साथ सोडलेली नाही. मी अजित पवारांच्या पक्षात दाखल होत आहे, ही अफवा कोण पसरत आहे हे माहिती नाही. शरद पवारांसोबत तीन दशकं कम करणारे नेते पक्ष का सोडत आहेत याचा विचार सुप्रियाताईंनी करावा. मी सुप्रिया ताईंमुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय. धीरज शर्मा यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्यामुळेच पक्ष सोडला असल्याचा दावा दुहान यांनी केला.
शरद पवारांशी या विषयावर 22 तारखेला बोलणं झालं होतं. त्यांनी हा विषय समजून घेतला. पण, दुसऱ्याच दिवशी सुप्रिया ताईंकडून फोन आला. त्या फोनवर काही अशा गोष्टी सांगितल्या जातात की आता राम राम करावा अशीच इच्छा होती. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा संबंध नाही. सध्या तरी मी घरीच बसण्याचा विचार करत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
कोण आहेत दुहान?
सोनिया दुहान यांनी बराच काळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवक्ता म्हणून काम केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 च्या राजकीय घटनाक्रमानंतर सोनिया चर्चेत होत्या. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथ सोहळ्यानंतर राष्ट्रवादीचे काही आमदार खासगी विमानाने दिल्लीतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी शरद पवारांनी सोनिया यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. यावेळी सोनिया यांना चार आमदारांना हॉटेलमधून बाहेर काढलं होतं. यामध्ये नरहरी झिरवळ, दौलत दरोदा, अनिल पाटील आणि नितीन पवार यांचा समावेश होता. चौघेही जणं अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर बेपत्ता झाले होते.
( नक्की वाचा : 'शरद पवार धादांत खोटं बोलत आहेत', अजित पवारांचा थेट निशाणा )
तब्बल अडीच वर्षांनंतर म्हणजे 2022 मध्ये महाविकास आघाडी जेव्हा संकटात सापडली त्याहीवेळी सोनिया दुहान यांनी मोर्चा सांभाळला. सूरत ते गुवाहाटी आणि पुन्हा गोव्यापर्यंत बंडखोर आमदारांचा पाठलाग केला. गोव्यात सोनिया दुहान यांना आमदार राहणाऱ्या हॉटेलमध्ये प्रवेश करण्यात यश मिळालं. मात्र गोवा पोलिसांनी सोनिया यांना अन्य एका साथीदारासोबत अटक केली होती. सोनिया दुहान यांना एनसीपीची लेडी जेम्स बॉन्डही म्हटलं जातं. काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी राजीनामा दिला होता, त्यावेळी राजीनामा देण्यास विरोध करणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता.