लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. 13 जागांसाठी झालेल्या या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला 10 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपला केवळ 2 जागा जिंकता आल्या आहेत. तर अपक्ष उमेदवारांनी बिहारमध्ये नितीश कुमारांबरोबरच लालू प्रसाद यादव यांना चकीत करत विजयाचा झेंडा रोवला आहे. इंडिया आघाडीत काँग्रेसने 4, तृणमुल काँग्रेसने 4 तर आप आणि डिएमकेने प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे.
हिमाचल, उत्तराखंडमध्ये भाजपला धक्का
ज्या राज्यात पोटनिवडणुका झाल्या त्यात हिमाचल प्रदेशमधील 3 आणि उत्तराखंड मधील 2 जागांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेशातील धीरा आणि नलघर या मतदार संघात काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर हमिरपूर मतदार संघ भाजपने थोड्या मताधिक्याने स्वत:कडे राखला. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर या धीरा विधानसभा मतदार संघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्य होशियार सिंह यांचा नऊ हजार मताच्या फरकाने पराभव केला. हिमाचल बरोबरच दुसरे पहाडी राज्य म्हणून ओळख असलेल्या उत्तराखंडमध्येही भाजपला धक्का बसला आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ आणि मंगलूर विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे. काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र भंडारी यांनी लोकसभेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी बद्रीनाथ विधानसभेच्या सदस्य पदाचा राजिनामा दिला होता. त्यामुळे पोटनिवडणूक झाली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मध्यप्रदेशात कमलनाथ यांना धक्का
मध्यप्रदेशच्या अमरवाडा विधानसभा मतदार संघात भाजपने विजय मिळवला आहे. कमलनाथ यांचा गड असलेल्या छिंदवाड लोकसभा मतदार संघातील अमरवाडा हा विधानसभा मतदार संघ आहे. कमलनाथ यांचे विश्वासू कमलेश शहा यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा विजय मिळवत काँग्रेसला धक्का दिला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा तीन हजार मतांनी पराभव केला. हा कमलनाथ यांच्यासाठी धक्का समजला जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - ...तर 288 उमेदवारांना पाडू; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
तामिळनाडू, पंजाबमध्ये इंडिया आघाडीचा डंका
तामिळनाडू आणि पंजाबमध्येही एका जागेसाठी पोटनिवडणुक झाली होती. तामिळनाडूच्या विक्रवंदी विधानसभेसाठी पोटनिवडणूक झाली. त्यात डीएमकेच्या उमेदवाराने विजय नोंदवला आहे. तर पंजाबच्या जालंधर पश्चिम विधानसभेत आम आदमी पार्टीने विजयाचा झेंडा रोवला आहे.
ट्रेंडिंग बातमी - मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार?, सरकारला दिलेला अल्टिमेटमही आज संपणार
पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींचा दबदबा
पश्चिम बंगालच्या चार विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली. या चारही मतदार संघात ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय नोंदवला आहे. या चारही मतदार संघात तृणमुल काँग्रेस विरूद्ध भाजप असा थेट सामना होता. या चारही लढतीत तृणमुलने भाजपला एकतर्फी हरवले आहे. चारही उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय नोंदवला आहे.