अमजद खान
शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांनाच भिडल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. एका रस्त्याच्या काँक्रीटीकरणावरून हा वाद झाला. माजी नगरसेवकाला एका महिला शिवसैनिकाने यावेळी फैलावरच घेतलं. दोन्ही गट एकमेकां समोर ठाकले. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे भर रस्त्यावर एकच गोंधळ उडाला होता. विशेष म्हणजे या रस्त्याच्या उद्घाटनासाठी स्थानिक आमदार पुत्र आले होते. पण त्यांच्या समोरच हा राडा झाल्याने त्यांनीही तिथून घाईघाईत उद्घाटन करुन तिथून काढता पाय घेतला. शिंदेंच्या सेनेतच झालेल्या या राड्याची चर्चा कल्याणमध्ये मात्र चांगलीच रंगली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण पश्चिमेतील मोहिंदर सिंग काबूल सिंग परिसरात एका रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते होणार होता. ते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांचा मुलगा वैभव भोईर हे कार्यक्रमास उपस्थित राहिले. यावेळी शिवसेना माजी नगरसेवक मोहन उगले यांनी या कार्यक्रमाच्या शुभारंभाचा नारळ फोडण्याची सुरुवात केली. त्याच वेळी त्याठिकाणी शिवसेना महिला कार्यकर्त्या राणी कपोते पोहचल्या.
त्यावेळी मोहन उगले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्याच वेळी दुसरीकडे राणी कपोते यांनी ही घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे कार्यकर्ते आणि उपस्थितांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आमदार सुपुत्र वैभव भोईर यांना थोड्या वेळासाठी काय सुरू आहे हे समजलेच नाही. या बाबत मोहन उगले याचे म्हणणे आहे की,या ठिकाणी गोंधळ झालेला नाही. त्या महिला आमच्या पक्षाच्या पदाधिकारी नाहीत. कोणी तरी येत असेल आणि काही करत असेल तर आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा आपण केला आहे असा दावा त्यांनी यावेळी केला.
ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, इंजिनिअर लेकाला मुस्लीम देशात अटक, प्रकरण काय?
या रस्त्याच्या कामासाठी अर्थ संकल्पात तरतूद केली होती. पण जर कुणी पत्र दिले असेल तर त्याला पाठपुरावा म्हणता येत नाही. हे कामा माझ्यामुळेच झाले आहे, असं ही ते म्हणाले. तर या रस्त्याची फाईल रद्द झाली होती. हे नगरसेवक होते तर त्यांनी त्यासाठी का पाठपुरावा केला नाही? पाठपुराव्याची सगळी कागदपत्रे माझ्याकडे आहेत. आमदार विश्वनाथ भोईर यांना हा विषय सांगितला होता. या रस्त्याची फाईल पूर्ण झाली आहे. त्याची माहिती आमदारांना दिली होती. मी पाठपुरावा करीत आहे. असं शिवसेना कार्यकर्त्या राणी कपोते यांनी सांगितले.
या रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार आहे. नागरिकांसाठी हा रस्ता तयार होणार आहे. रस्ता लवकरात लवकर तयार झाला पाहिजे. मात्र श्रेय वादावरुन कोणत्याही प्रकाराचा गोंधळ आणि आरोपप्रत्यारोप करणे योग्य नाही. शिवसेना नेत्यांनी या प्रकरणात पदाधिकाऱ्यांना समज दिली पाहिजे. शिवसेनेच्या एका कार्यक्रमात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे पक्षासाठी चांगले नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळा बरोबरच शिवसेना शिंदे गटातही रंगली आहे.