Kalyan News : कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप (BJP) यांच्यात जोरदार जुंपली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युती तोडण्याची थेट भाषा वापरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला 'आडवे करू' असे थेट आव्हान दिले, तर यावर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी 'युती तोडा, तेव्हा कोणाची किती ताकद कळेल,' असे सडेतोड प्रत्युत्तर दिले.
शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा भाजपावर निशाणा
बुधवारी संध्याकाळी शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या वतीने आयोजित 'नारी शक्ती मेळाव्या'त जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. मोरे म्हणाले, “शिवसेनेचे 10 बंडखोर उभे होते, त्यामुळेच तुमच्या गळ्यात आमदारकीची झालर पडली, हे विसरू नका.”
मोरे यांनी भाजपवर 'दुटप्पी खेळ' खेळण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, शिवसेनेच्या जीवावर श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायचे आणि त्याचवेळी शिवसेनेच्या शिलेदारांवर वार करायचे, हा शिवसेनेचा स्वभाव नाही. युती झाली नाही तर भाजपला 'आडवे' करण्याची भाषा मोरे यांनी स्पष्टपणे केली आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : गुड न्यूज! फक्त 7 महिने थांबा, कल्याण-डोंबिवलीकरांची मोठ्या वाहतूक कोंडीतून होणार कायमची सुटका )
'युती करताना पाठीत खंजीर खुपसले'
जिल्हाप्रमुख मोरे यांच्या टीकेला भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तितक्याच सडेतोड भाषेत उत्तर दिले आहे. पवार म्हणाले की, मोरे यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की युती असतानाही त्यांनी बंडखोरी केली. याचा अर्थ 'युतीचा धर्म त्यांनी पाळला नाही.' भाजपला वारंवार युती तोडून मागे यावे लागले, कारण "जेव्हा-जेव्हा युती केली, तेव्हा अशाप्रकारे पाठीत खंजीर खुपसले."
पवार यांनी शिवसेना (शिंदे गट) यांना थेट आव्हान दिले आहे. ते म्हणाले, “ त्यांना युती नको असेल, तर त्यांनी उघडपणे 'डिक्लेअर' करावे. समोरासमोर लढू. भाजपच सरस ठरणार. युती तोडा, तेव्हा कोणाची किती ताकद आहे हे कळेल.”
'कोकण वसाहत' आणि 'बिल्डर लॉबी'चा मुद्दा
पवार यांनी शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, युतीच्या बाजूने कोकण वसाहतीतील नागरिकांनी भोईर यांना मतदान केले. मात्र, याच नागरिकांसाठी मी उपोषणाला बसलो असताना शिवसेना आमदार भोईर हे बिल्डरांच्या बाजूने उभे राहिले, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
या शाब्दिक युद्धामुळे KDMC निवडणुकीत दोन्ही सत्ताधारी पक्ष एकत्र लढणार की, त्यांचा मार्ग वेगळा होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.