राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी रविवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांचे मोठे चिरंजीव तेज प्रताप यादव यांना पक्षातून काढून टाकले आहे. शनिवारी तेज प्रताप त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधित खुलास्यामुळे ते चर्चेत होते. त्यांच्या फेसबुक पोस्टवर अनुष्का यादव नावाच्या मुलीसोबतचा फोटो समोर आला होता. या पोस्टमध्ये लिहिले होते की, तेज प्रताप यादव आणि अनुष्का 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांनी रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते. मात्र, नंतर तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'(X) वर पोस्ट करत त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे म्हटले होते. आता आज लालू प्रसाद यादव यांनी मोठा निर्णय घेत तेज प्रताप यादव यांना पक्षातून काढून टाकले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एक पोस्ट लिहित तेज प्रताप यादव यांना पक्ष आणि कुटुंबातून बाहेर काढण्याची घोषणा केली. लालू प्रसाद यादव यांनी लिहिले, "खाजगी आयुष्यात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष करणे आपल्या सामाजिक न्यायासाठीच्या सामूहिक संघर्षाला कमजोर करते. मोठ्या मुलाची कृती, सार्वजनिक आचरण आणि गैर जबाबदार वर्तन करणारी आहे. आपल्या कौटुंबिक मूल्यांशी आणि संस्कारांशी ते जुळणारे नाही. त्यामुळे त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर करत आहे. आतापासून पक्ष आणि कुटुंबात त्याची कोणतीही भूमिका राहणार नाही. त्याला पक्षातून 6 वर्षांसाठी काढण्यात आले आहे.
लालू प्रसाद यादव यांनी पुढे लिहिले की,"आपल्या खाजगी आयुष्यातील चांगले वाईट गुण-दोष पाहण्यात तो स्वतः सक्षम आहे. त्याच्याशी जे कोणी संबंध ठेवतील, त्यांनी स्वविवेकबुद्धीने निर्णय घ्यावा. सार्वजनिक जीवनात प्रत्येकाने स्वच्छ प्रतिमेने वावरले पाहिदे. त्याचा मी समर्थक राहिलो आहे. कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात याचा विचार स्वीकारला पाहिजे असं ही लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं आहे. तेज प्रताप यांच्या पोस्टवरून सुरू असलेल्या वादानंतर राजद नेते आणि त्यांचे धाकटे भाऊ तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे की, ते अशा प्रकरणांना सहन करत नाहीत. त्यांचा पक्ष बिहारच्या जनतेसाठी पूर्ण मेहनतीने काम करत आहे. "जर माझ्या मोठ्या भावाची गोष्ट असेल तर राजकीय जीवन आणि वैयक्तिक जीवन वेगळे असतात. त्यांना त्यांचे खाजगी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते स्वतंत्र आहेत. आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी याबाबत आपले मत स्पष्ट केले आहे.
शनिवारी तेज प्रताप यादव यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तेज प्रताप यादव यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट करण्यात आली होती, ज्यात तेज प्रताप एका मुलीसोबत दिसत होते. या पोस्टमध्ये लिहिले होते, "मी तेज प्रताप यादव आणि माझ्यासोबत या चित्रात दिसत असलेल्या मुलीचे नाव अनुष्का यादव आहे! आम्ही दोघे गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि प्रेमही करतो. आम्ही दोघे गेल्या 12 वर्षांपासून एका रिलेशनशिपमध्ये राहत आहोत.
मात्र, नंतर ही पोस्ट हटवण्यात आली होती. त्यानंतर रात्री तेज प्रताप यादव यांनी 'एक्स' वर लिहिले, "माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक करून आणि माझे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करून मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. बदनाम केले जात आहे. मी माझ्या हितचिंतकांना आणि फॉलोअर्सना विनंती करतो की त्यांनी सतर्क रहावे आणि कोणत्याही अफवेकडे लक्ष देऊ नये. असं आवाहन त्यांनी केलं. तेज प्रताप यादव विवाहित आहेत. मात्र, त्यांचे वैवाहिक जीवन वादात अडकले आहे. तेज प्रताप यादव यांचा विवाह मे 2018 मध्ये माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्वर्याशी झाला होता. दोघांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे.