Viral video: अजित पवारांच्या पक्ष कार्यालयात 'वाजले की बारा'चे सुर, ठेका धरत लावणीचे सादरीकरण

या कार्यक्रमात लावणी सादर झाल्याने वाद निर्माण झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

प्रविण मुधोळकर 

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दुसरा तिसरा कुणाचा नसून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधीत आहे. पक्षाच्या कार्यालयातच लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाजले की बारा या गाण्यावर चक्क पक्ष कार्यालयात लावणी सादर करण्यात आली. विशेष म्हणजे लावणी सादर करणारी महिला ही पक्षाचीच कार्यकर्ता होती. त्यांच्या लावणीवर पक्षाचे इतर कार्यकर्ते शिट्ट्या आणि टाळ्या वाजवताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 

हा व्हिडीओ  नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या कार्यालयातील आहे. ते आता स्पष्ट झाले आहे. या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच वेळी ही लावणी सादर केली गेली. लावणी सादर केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. याच कार्यालयाचे दोन महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. अशा या नव्या कोऱ्या कार्यालयात ही प्रकार घडल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 

या कार्यक्रमात लावणी सादर झाल्याने वाद निर्माण झाला आहे. मात्र लावणी सादर करणाऱ्या कलाकार महिला या पक्षाच्या कार्यकर्त्या असल्याचे पक्षानेच स्पष्ट केले आहे. शिवाय  हा पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यातून त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर पडदा टकण्याचा प्रयत्न केला आहे. पण याबाबत मात्र बाहेर चुकीचा संदेश गेला असल्याचं ही बोललं जात आहे.