प्रसाद पाटील, प्रतिनिधी
Bharat Gogawale vs Aditi Tatkare : रायगड जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील शासकीय ध्वजारोहणावरून गेल्या काही काळापासून राजकीय वादविवाद सुरु होते. परंतु, आता मुख्यालयातील ध्वजारोहणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढलं आहे. या परिपत्रकानुसार यंदाच्या प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्हा मुख्यालयातील ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील तटकरे-गोगावले राजकीय संघर्षाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे.दुसरीकडे, गोगावले समर्थकांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालं आहे.
भरत गोगावले यांनी त्यावेळी घेतली संयमाची भूमिका
रायगडचे पालकमंत्री पद स्थगित झाल्यापासून जिल्हा मुख्यालयातील ध्वजारोहणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सूक्ष्म पातळीवर रस्सीखेच सुरू होती.गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व मंत्री आदिती तटकरे यांना अलिबाग येथील ध्वजारोहणाचा मान देण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. परंतु, मंत्री भरत गोगावले यांनी वरिष्ठांचा निर्णय असल्याचे सांगत संयमाची भूमिका घेतली होती.
नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मुंबईतील प्रसिद्ध महिला नगरसेवक शिंदें गटाच्या गळाला, सेना भवनात काय घडलं?
गोगावले समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण
यंदा प्रजासत्ताक दिन जवळ येत असताना पुन्हा एकदा ‘मान कोणाला?'याबाबत जिल्ह्यात चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकात स्पष्टपणे मंत्री भरत गोगावले यांचे नाव नमूद करण्यात आल्याने सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. या निर्णयामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गोगावले समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नक्की वाचा >> Bank Holiday Jan 2026: 24 ते 27 जानेवारीपर्यंत बँका बंद राहणार की सुरु? प्रत्येक शनिवारी बँकांना सुट्टी? वाचा
या निर्णयामुळे गोगावले यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. रायगड जिल्ह्यातील ध्वजारोहणाचा मान कोणाला मिळतो, यावरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांना आता प्रशासकीय निर्णयामुळे पूर्णविराम मिळाला असून यंदाचा प्रजासत्ताक दिन अलिबागमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते साजरा होणार आहे.