
Honeytrap Case: राज्यात सध्या हनी ट्रॅपची गरमागरम चर्चा आहे. यामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. त्याचबरोबर आजी आणि माजी मंत्रीही यामध्ये अडकले असल्याचा दावा केला जातोय.मंत्रालय, मुंबई. ठाणे आणि नाशिकमधले अधिकारी या हनी ट्रॅपमध्ये फसलेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत आज (गुरुवार 17 जुलै) याबाबतचा पेन ड्राईव्ह दाखवतच खळबळ उडवून दिली आहे.
काय आहे प्रकरण?
ठाणे आणि नाशिकमध्ये महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली. या हनी ट्रॅपचं जाळं मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये पसरल्याचं मानलं जात आहे. या हनी ट्रॅपमध्ये राज्यातले एकूण 72 सरकारी अधिकारी सापडल्याचा आरोप आहे.
त्यामध्ये सात क्लास वन प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी, आजी-माजी मंत्री, राज्यातले 3 डीसीपी अर्थात पोलीस आयुक्त, काही महसूल अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त यामध्ये अडकल्याचा आरोप आहे.
( नक्की वाचा: लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकार, अन्यथा अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन! महिलेनं दिली नवऱ्याला धमकी )
काय होती हनी ट्रॅपची पद्धत?
नाशिकच्या एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. हनी ट्रॅपमध्ये फसवणाऱ्या या महिलेला 2016 मध्ये पोलिसांनी पकडलं होतं. ती विधवा असल्याचं सांगते. मदत मागण्याचा बहाणा करते....व्हॉटसअप चॅट करते, नंतर व्हिडीओ रेकॉर्ड करते. गुपचूप फोटो आणि व्हिडीओ काढते नंतर हेच व्हिडीओ दाखवून बदनामी करायची धमकी देते. त्या बदल्यात 40 लाख उकळते
या हनी ट्रॅपचा मास्टरमाईंड नाशिकचा असल्याची चर्चा आहे. तो उत्तर महाराष्ट्रातल्या एका मंत्र्याचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जातंय. नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये अधिकारी गेले होते आणि तिथेच ते हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले. याबाबत काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओही समोर आलेत. तर, अनेक प्रकरणांमध्ये सेटलमेंट करण्यात येऊन प्रकरण मिटवण्यात आल्याचीही खुमासदार चर्चा रंगलीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world